इतक्या कमी दिवसात घटस्फोट मिळण्याची पहिलीच वेळ
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दोघेही उच्चशिक्षित. जानेवारी २०१९ मध्ये दोघांचे लग्न झाले. मात्र वर्षभरातच दोघे वेगळे राहायला लागले. दावा दाखल केल्यापासून घटस्फोटासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागत असतो; मात्र दोघे सुमारे दीड वर्षापासून विभक्त राहायला लागले. आता सहा महिने थांबणे शक्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निवाड्याच्या आधारे वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे केवळ आठ दिवसातच या दाम्पत्याचा घटस्फोट मंजूर करण्यात आला आहे. वैचारिक मतभेदामुळे दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दाखल केलेला अर्ज कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश एच. के.गणात्रा यांनी मंजूर केला.
सुमित आणि स्मिता (दोघांचे वय ३०) अशी दोघांची नावे आहेत. तो आर्किटेक्ट आणि ती डॉक्टर आहे. दोघांचे रितसर पाहणी करून अरेंज मॅरेज झाले; मात्र दोघांचे पटेनासे झाल्याने ते जानेवारी २०२० पासून विभक्त राहात असल्याने दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला. पतीकडून ॲड. प्रणयकुमार लंजिले, ॲड. नयना अनभुले, ॲड. अनिकेत डांगे आणि ॲड. लक्ष्मण काशिनाथराव सावंत यांच्यामार्फत दावा दाखल केला. ऑगस्ट महिन्यातील शेवटच्या आठवड्यात हा निकाल झाला. दोघांना अपत्य नव्हते. पतीने तिला १२ लाख रुपये देण्याचे मान्य करण्यात आले.
दोघेही दीड वर्षाहून अधिक काळ विभक्त राहत होते. दोघांना एकत्र आणण्यासाठी कुटुंबीयांच्या चार ते पाच बैठका झाल्या. त्यामध्ये दोघे एकत्र येणे शक्य नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दोघांनी परस्पर संमतीने केलेले अर्ज न्यायालयाने त्वरित मंजूर केला. त्यामुळे वेळेची बचत झाली आहे. दोघेही स्वतंत्रपणे जीवन जगण्यास मोकळे झाले असल्याचे पतीचे वकील ॲड. प्रणयकुमार लंजिले यांनी सांगितले.
------------------------------------