सुषमा नेहरकर- शिंदे पुणे : शहर आणि जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन कोट्यवधी रुपये खर्च करून एका महिन्यात दोन जम्बो कोविड हाॅस्पिटल उभ्या करणाऱ्या याच प्रशासनाला सर्व सोयी सुविधांनी सज्ज असलेले फुकटात उपलब्ध झालेले तब्बल ५०४ क्षमतेचे "विप्रो कोविड हाॅस्पिटल " चार महिन्यानंतरही पूर्ण क्षमतेने सुरू करता आलेले नाही. रुग्णांना बेड्स मिळण्यासाठी जीवाचा प्रचंड अटापीटा करावा लागत असताना निष्काळजी प्रशासनामुळे विप्रो हाॅस्पिटलमध्ये सध्या केवळ १८० रुग्णांना दाखल करून घेतले जात आहे. एवढेच नाही तर तज्ज्ञ डाॅक्टर उपलब्ध नसल्याने येथील व्हेंटिलेटर धूळ खात पडून असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर अनेक खाजगी कंपन्या, संस्थांनी पुढाकार घेऊन जिल्हा परिषदेला मदत म्हणून अनेक कोविड केअर सेंटर सुरू केली आहेत. मुळशी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर विप्रो कंपनीने हिंजवडी येथे तब्बल ५०४ खाटांची सोय, १० आयसीयु बेड आणि ५ व्हेंटिलेटर असलेले अत्यंत सुसज्ज कोवीड कोविड हाॅस्पिटल सुरू केले. या कोविड हाॅस्पिटल चे ११ जुन रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन पध्दतीने या केंद्राचे उद्घाटन केले. मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेले विप्रो कोविड हाॅस्पिटल एक महिन्यानंतर देखील सुरू नसल्याचे लोकमतने उघडकीस आणले होते.विप्रो कंपनीकडून सर्व सोयीसुविधा निर्माण करुन हे हाॅस्पिटल जिल्हा परिषदेच्या ताब्यात दिले. या आरोग्य आवश्यक असलेले मनुष्यबळ मात्र जिल्हा परिषदेने द्यायचे होते. परंतु केवळ कर्मचारी उपलब्ध नसल्याने एक महिन्यांपासून सर्व सोयी-सुविधांनी युक्त असलेले रुग्णालय सुरु होऊ शकले नव्हते. त्यानंतर थेट पालकमंत्री अजित पवार यांनीच आदेश दिल्यानंतर तातडीने लातूर येथून काही डॉक्टर्स, नर्स मागावून हे हाॅस्पिटल सुरू करण्यात आले. सध्या हाॅस्पिटलमध्ये जागा शिल्लक नसल्याचे सांगत रुग्णांवर उपाचार टाळले जात आहे, तर एकीकडे कर्मचारी, डॉक्टर, नर्स नसल्याने सर्व सर्व सोयी सुविधा युक्त विप्रो कोविड हाॅस्पिटल रिकामे पडले आहे.------इतर जिल्ह्यातील डाॅक्टर, नर्सवर विप्रो कोविड हाॅस्पिटलची भिस्तजिल्हा परिषदेच्या वतीने विप्रो कोविड हाॅस्पिटल व अन्य हाॅस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी डाॅक्टर, नर्स, तज्ज्ञ डाॅक्टर व अन्य आरोग्य कर्मचारी भरतीसाठी वेळोवेळी जाहिरात प्रसिद्ध केल्या आहेत. परंतु अद्याप ही डाॅक्टर, नर्स उपलब्ध झाले नाहीत. यामुळेच सध्या लातूर व अन्य जिल्ह्यातील डाॅक्टर, नर्सची सध्या विप्रो कोविड हाॅस्पिटल साठी आठ-नऊ दिवसांसाठी नियुक्ती करण्यात येत आहे. यामध्ये आठ-आठ दिवसांसाठी चक्राकार पध्दतीने या नियुक्त्या केल्या जात असल्याने दर आठवड्याला नवीन येणाऱ्या डाॅक्टर, नर्सला रुग्णांची माहिती देणे , हाॅस्पिटल व्यवस्थापन समजण्यासाठीच तीन-चार दिवस जातात. यामुळे सध्या विप्रो कोविड हाॅस्पिटलची भिस्त अन्य जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांवरच असल्याचे स्पष्ट झाले.-----पुढील काही दिवसांत पूर्ण क्षमतेने विप्रो कोविड हाॅस्पिटल सुरू करणार ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. तसेच सध्या जिल्ह्यातील सर्व हाॅटस्पाॅट गावांमध्ये शंभर टक्के लोकांची तपासणी करण्यात येत आहे. यामुळे पुढील पंधरा दिवसांत ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसेल. या पार्श्वभूमीवरच मुळशी तालुक्यातील विप्रो कोविड हाॅस्पिटल येत्या काही दिवसांत पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे नियोजन केले आहे. - सौरभ राव, विभागीय आयुक्त