नीरा : नीरा येथे गेल्या चार वर्षांपूर्वी नीरा व परिसरातील गुन्हेगारांचा वावर वाढला होता. त्यामुळे गुन्हेगारांचा शोध व ओळख पटविण्यासाठी तसेच ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी नीरा गावांतील चौकाचौकांत सीसीटीव्ही बसविण्यासाठी तत्कालीन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे ग्रामस्थांनी लोकवर्गणी देऊनही आजपर्यंत बसवलेच नाहीत. यामध्ये नक्की काय गौडबंगाल आहे, हे जेजुरीच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी या प्रश्नात लक्ष घालून सीसीटीव्ही लवकर बसवावेत, अशी मागणी होत आहे.
जेजुरी पोलीस स्टेशन अंकित नीरा पोलीस दूरक्षेत्रात २७ सप्टेंबर २०१७ रोजी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर
झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत गणेशोत्सवाच्या मंडळानी तसेच ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून नीरा गावांत सीसीटीव्ही बसविण्सासाठी सहकार्य करावे, असे आवाहन तत्कालीन जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत नीरा (ता.पुरंदर) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी, व्यावसायिकांनी तसेच प्रतिष्ठित ग्रामस्थांनी सुमारे दोन लाख रूपये लोकवर्गणी जमा करून तत्कालीन सहा. पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व तत्कालीन नीरा पोलीस दूरक्षेेत्राचे पोलीस कर्मचाऱ्यांकडे दिली होती. मात्र आजपर्यंत नीरा गावात सीसीटीव्ही बसवलेच नाहीत.
सप्टेंबर २०१७ मध्ये नीरा येथील ग्रामस्थांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसविण्यासाठी सुमारे दोन लाख रुपये लोकवर्गणी तत्कालीन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे जमा केलेली होती. जेजुरीचे प्रभारी अधिकारी यांनी गेल्या चार वर्षापासून लोकवर्गणीच्या रकमेचा सखोल तपास करून त्या रकमेतून नीरेत सीसीटीव्ही बसवून, थोड्याच दिवसांत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठकीत नागरिकांना विश्वास द्यावा, असे मत नागरिक व्यक्त करीत आहे.
पोलिसांचीच फसवणूक केली असल्याची चर्चा
गेल्या दोन वर्षांपूर्वी म्हणजे १ सप्टेंबर २०१९ रोजी तत्कालीन जेजुरीचे सहा. पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नीरा पोलिस दूरक्षेत्रात बैठक आयोजित केली होती. त्यावेळीही ग्रामस्थांनी सीसीटीव्हीकरिता दिलेल्या लोकवर्गणीचा पाढा वाचला. तत्कालीन नीरा पोलिस दूरक्षेत्रातील पोलिस कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली असता सदरची रक्कम लोणंद (ता.खंडाळा) येथील धायगुडे नावाच्या ठेकेदाराला दिले असल्याची माहिती समोर आली. तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला पैसे देऊनही सीसीटीव्ही न बसविल्याबाबात जाब विचारला. तरीही तो पोलिसांना जुमानत नसल्याने पोलिसांनी त्या ठेकेदाराला नीरा पोलिस दूरक्षेत्रात दोन दिवस डांबून ठेवून त्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल केला असल्याचे समजते. परंतु तरीही संबंधित ठेकेदाराने पैसे घेऊनही आजपर्यंत नीरा गावांतील चौकाचौकांत सीसीटीव्ही बसविले नाही. उलट पोलिसांचीच फसवणूक केली असल्याची चर्चा नागरिक करीत आहे.