पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात कॉँग्रेसकडून इच्छुक असलेले संभाजी ब्रिगेडच नेते प्रवीण गायकवाड शनिवारी कॉँग्रेसमध्ये डेरेदाखल झाले. मुंबईतील टिळक भवन या कॉँग्रेस मुख्यालयात त्यांच्यासह संभाजी ब्रिगेडच्या काही पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचा ‘हात’ हातात घेतला. त्यामुळे गायकवाड यांचे नाव पुन्हा एकदा कॉँग्रेसकडून चर्चेला आले आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली नव्हती.
पुण्यातून लोकसभेसाठी शरद पवार यांनी गायकवाड यांचे नाव सुचविल्याची चर्चा होती. मात्र, पक्षाच्या बाहेरील उमेदवार यामुळे ‘निष्ठावंत’ कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांना विरोध केला होता. कॉँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. कॉँग्रेस भवनमध्ये झालेल्या कॉँग्रेस- राष्टÑवादीच्या एकत्रित बैठकीनंतर गायकवाड नाराज होऊन निघून गेल्याचीही चर्चा होती. आपण उमेदवारीच्या शर्यतीत नसल्याचे सांगितले होते. पण दोन दिवसांत उमेदवारीवरून घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी गायकवाड यांना कॉँग्रेसच्या पश्चिम महाराष्टÑ प्रभारी सोनल पटेल यांनी त्यांच्याशी चर्चा केली. मी अनेक वर्षांपासून पक्षाच्या विचाराचा असून लवकर काँग्रेसमध्ये अधिकृतपणे प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. शनिवारी मुंबईत काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीनंतर महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थित गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडच्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर, उपाध्यक्ष दत्तात्रय जाधव, जिल्हाध्यक्ष अजय सावंत, विशाल तुळवे, मुंबई प्रदेशाध्यक्ष अमोल जाधवराव, जिजाऊ ब्रिगेडच्या माजी प्रदेश कार्याध्यक्ष सारिका भोसले, माजी जिल्हाध्यक्ष प्राची दुधाने, अॅड. प्रमोद गोतार्णे, किशोर मोरे, प्रफुल्ल गुजर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.काँग्रेस प्रवेशावर बोलताना गायकवाड म्हणाले, सध्या पुरोगामी व प्रतिगामी संघर्ष सुरू आहे. या वातावरणात राजकीय भूमिका घेतली पाहिजे. म्हणून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. पुण्यामध्ये काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त आहे. काँग्रेसचा उमेदवार निवडून आणायचा असल्यास दोन्ही काँग्रेस व मनसेची ताकद एकत्र यायला हवी. उमेदवार कुणीही असला तरी प्रचारात सहभागी होणार आहे.
1 काँग्रेसकडून पुण्यातील लोकसभा उमेदवारीवर अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही. मुंबईत वरिष्ठ नेत्यांच्या बैैठकीनंतर उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी आणखी दोन-तीन तासाने उमेदवाराचे नाव स्पष्ट होईल, असे सांगितले. पण रात्री उशिरापर्यंत नाव जाहीर झाले नाही. प्रवीण गायकवाड यांच्या पक्षप्रवेशाने उमेदवारीचा तिढा वाढला असल्याची चर्चा आहे.
2भाजपाने उमेदवाराच्या नावाची घोषणा करून आठवडा उलटलातरी काँग्रेसला अद्याप उमेदवार ठरविता आलेला नाही. महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे व गायकवाड यांची नावे आघाडीवर आहेत. गायकवाड यांचा पक्षप्रवेश आणि उमेदवारीचा घोषणा एकाचवेळी होईल, अशी चर्चा होती. गायकवाड यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खरगे व चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी चव्हाण यांनी रावेर येथील उमेदवाराची घोषणा केली. पण पुण्याच्या उमेदवारीबाबत चव्हाण यांनी काहीही सांगितले नाही.
3खरगे यांनी पुण्यातील उमेदवाराबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितल्यानंतर ते तरी नाव जाहीर करतील, अशी शक्यता होती.पण त्यांनीही दोन-तीन तासांनी उमेदवार जाहीर केला जाईल, असे सांगून सस्पेन्स कायम ठेवला. त्यामुळे सायंकाळनंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे डोळे टीव्हीकडे लागून राहिले होते. पण रात्री उशिरापर्यंत नाव स्पष्ट झाले नाही.