नीलेश राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहर, जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यांतील सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय सुविधा देणाऱ्या ससून सर्वोपचार रुग्णालयात होणाऱ्या जन्म व मृत्यूची नोंदणी करून रुग्णालयामार्फतच मृत्यू वा जन्म दाखले द्यावेत, असे आदेश राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १२ एप्रिल २०१८ रोजीच दिले. मात्र या आदेशावर अजूनपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. ‘ससून’मधल्या जन्म-मृत्यूच्या ‘दाखल्यां’साठी अजूनही महापालिकेकडेच बोट दाखविले जात आहे़
‘ससून’मध्ये पुण्यासह प्रामुख्याने नगर, सोलापूर, सातारा, सांगली व अन्य जिल्ह्यांतून सामान्य नागरिक उपचारासाठी येतात़ ससूनमध्ये उपचार घेताना अथवा ससूनमध्ये येताना रुग्णवाहिकेत मृत्यू होतो. प्रसूती, प्रसूतीपूर्व तसेच प्रसूतीपश्चात उपचार येथे केले जातात. यादरम्यान जन्म-मृत्यूच्या घटना ससून इमारतीमध्ये अथवा परिसरात घडतात. या सर्वांचे दाखले सध्या पुणे महापालिकेकडून घ्यावे लागतात़
यात होणारा कालापव्यय तसेच महापालिकेवर येणारा ताण लक्षात घेता राज्य शासनाने ससून इमारत व परिसरातील जन्म व मृत्यूची नोंदणी ससूनमध्येच व्हावी, असा आदेश काढला. त्यासाठी केंद्र शासनाच्या जन्म आणि मृत्यू अधिनियम कायद्यातील तरतुदीनुसार ‘निबंधक, जन्म व मृत्यू’ यांची स्वतंत्र नियुक्ती करून, नागरिकांना दाखले उपलब्ध करून देण्याचे आदेशही दिले आहेत़ मात्र ससून रूग्णालयाने हा आदेश अद्यापही गांभीर्याने घेतलेला नाही़
चौकट
नोंदीसाठी सामान्यांना हेलपाटे
परिणामी पुणे जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना जन्म व मृत्यू दाखल्यांसाठी महापालिकेच्या कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालय तथा नागरी सुविधा केंद्रांच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत़ त्यातच आवश्यक कागदपत्रे ससूनकडून प्राप्त न झाल्यास त्याची नोंद वेळेत होत नाही़ वारंवार खेटे घालूनही दाखले मिळत नसल्याने महापालिका यंत्रणाच दोषी धरली जात आहे़ या गोष्टीला आळा घालण्यासाठी व ससूनमध्येच नागरिकांना विनासायास दाखले मिळण्यासाठी ‘निबंधक, जन्म व मृत्यू’ हे पद तातडीने भरून स्वतंत्र यंत्रणा उभारणे आवश्यक झाले आहे़