शहरात गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत असला तरी सार्वजनिक गणेश मंडळांसह घरोघरी श्रींची प्रतिष्ठापना करून आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. त्याच बरोबर अधूनमधून पावसाची हजेरी लागते. अशा परिस्थितीत शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे ‘लोकमत’ने सोमवारी (दि. १३) मध्यरात्री पुणे स्टेशन येथील महापालिकेच्या जयाराम राजगुरु अग्निशमन दल केंद्रातील यंत्रणा किती सतर्क आहे, याची रिअॅलिटी चेक केली. त्यावेळी चालकासह चार कर्मचारी कामावर होते. एक कर्मचारी साप्ताहिक सुटीवर होता. या केंद्रावर एक बंब आणि देवदूत तैनात होते. केंद्रावर एकूण तीन सत्रात काम केले जाते. या तीनही सत्रात कर्मचारी सतर्कच असतात. तसेच कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्यामुळे सध्या कार्यकर्ते असलेल्या कर्मचाऱ्यांवर ताण येत असल्याचे समजून आले.
तयार स्थितीत बंब एक
अग्निशमन केंद्रामध्ये एक बंब तैनात होता. कोणत्याही क्षणी आगीची आपत्तीची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेण्याच्या तयारीत होता.
चालकाच्या हाती स्टेअरिंग
बंबाचा चालक हातात स्टेअरिंग घेऊनच बसलेला दिसून आला. त्यामुळे कोणत्याही क्षणी वेळे न जाता घटनास्थळी जाण्याच्या तयारीत असलेला दिसून आला.
नियम काय सांगतो?
अग्निशमन कार्यालयात आठ तासांच्या ड्यूटीवर सात कर्मचारी असणे आवश्यक आहे. पण कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने चारच जण कार्यरत असतात. यामध्ये एक चालक, एक फोन ऑपरेटर, दोन फायरमन असे कर्मचारी सेवेत होते.
अग्निशमन विभाग प्रमुखाचा कोट
आगीची किंवा अपघाताची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी पोहोचले जाते. वर्षातील बाराही महिने आम्ही सतर्क असतो. सणासुदीच्या काळात आग लागण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अधिक सतर्कतेने जागृत राहून कर्मचारी तैनात असतात. परिसरात वेळोवेळी नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जातात.
- विजय भिलारे, स्टेशन ड्यूटी ऑफिसर.