पुणे : शहराच्या रस्त्यानी आणि खड्डयांनी पुणेकरांच्या मागचा सहा वर्षे पाठलाग सोडला नाही. त्यामुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे, या सहा वर्षात पाच वर्षे भाजपचे पुण्यात ९६ नगरसेवक, ६ आमदार, १ खासदार असूनही फक्त टेंडर आणि टक्केवारी यामुळे पुणेकरांचे हाल झाले आहेत. रस्त्यांसाठी २ हजार ५०० कोटी खर्च करूनही पुणेकरांच्या नशिबी खड्डेच आले असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्यावतीने (ठाकरे गट) वतीने पुणे शहरात आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसैनिकांनी प्रशासन, महापालिका आयुक्त आणि भाजप यांच्याविरोधात घोषणा देत रस्त्यांवरील कोट्यावधी रूपयांच्या भ्रष्ट्राचाराची सीबीआयकडून चौकशी व्हावी अशी मागणी केली.
यावेळी बोलताना शहर प्रमुख संजय मोरे म्हणाले, समान पाणीपुरवठा योजनेसह विविध विकास कामे करताना होणारी खोदाई तसेच रिलायन्स कंपनीची केबल टाकणे, पावसाळी गटाराची कामे अशी अनेक स्वरूपाची नियोजन नसलेली कामे केल्यामुळे रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहेत. परंतु या कामाच्या दर्जाकडे प्रशासनाचे लक्ष नाही. काम करताना खोदाई केलेला रस्ता पूर्ववत करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला इस्टिमेट मध्ये नियोजन केलेले असते पण ते केले जात नाही व त्याकडे महापालिका का दुर्लक्ष करते. यातून पूर्णत: भ्रष्ट्राचार होत असून, त्याची सीबीआय चौकशी होणे जरूरी असल्याचे सांगितले.