पुणे : शहरातून तडीपार केल्यानंतर पिस्तूल घेऊन शहरात फिरणाऱ्या गुंडाला गुन्हे शाखेने अटक केली. सिंहगड रस्ता भागात कारवाई करीत गुंडाकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली. तर मुंढवा भागात तडीपार गुंडाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे.
अजय शंकर सुतार (वय २०, रा. श्रीनिवास अपार्टमेंट, नऱ्हे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सुतार याला शहरातून तडीपार केले आहे. तडीपारीचा आदेश भंग करून तो शहरात आला होता. सिंहगड रस्ता भागातील वडगाव उड्डाणपुलाजवळ तो थांबला होता. त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती गु्न्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरीविराेधी पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. पोलिस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक शाहिद शेख, बाळू गायकवाड, गणेश ढगे, रवींद्र लोखंडे आदींनी ही कारवाई केली.
दुसऱ्या एका कारवाईत मुंढवा भागात तडीपार गुंडाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला. सागर शंकर घोडके (वय २२, रा. कीर्तनेबाग, केशवनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तो मगरपट्टा सिटी भागात थांबला होता. पोलिसांच्या पथकाने त्याला पकडले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे, सहायक निरीक्षक संदीप जाेरे, दिनेश राणे, संतोष जगताप, दिनेश भांदुर्गे यांनी ही कारवाई केली.