लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर आजपर्यंत ७ लाख ४२ हजार ९२३ जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत़ परंतु, यापैकी ०.२७ टक्के नागरिक हे लसीचे दोन्ही डोस घेऊनही पंधरा दिवसांनंतर कोरोनाबाधित झाल्याचे दिसून आले आहे़ ही संख्या केवळ २ हजार ३६ इतकी आहे़
दरम्यान, यापैकी एकाही रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली नाही. ऑक्सिजनची गरज न पडल्याची दिलासादायक बाब या तपासणीत पुढे आली आहे़ पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी केली जाते़ या तपासणीत दुसरा डोस घेतल्यानंतरही बाधित झालेल्या २ हजार ३६ रुग्णांची माहिती समोर आली आहे़
पुणे महापालिका हद्दीत सुमारे २० लाख ६५ हजार ४४० जणांनी पहिला डोस घेतला़ दुसरा डोस होइपर्यंत यापैकी ३ हजार ४८ जण कोरोनाबाधित झाले़ ही टक्केवारी सुध्दा अत्यंत नगण्य असून, शहरात लसीचा पहिला डोस घेतल्यावर बाधित झालेल्यांची टक्केवारी ही ०.१४ टक्के आहे़ विशेष म्हणजे, पहिला डोस घेऊन बाधित झालेल्या नागरिकांनाही रुग्णालयातील उपचाराची गरज पडलेली नाही़
------------------------
लसीकरणानंतरचे ४१ मृत्यू, पण अन्य आजारही
शहरात पहिला डोस घेतलेल्या २० लाख ६५ हजार ४४० जणांपैकी मृत्यू झालेल्यांची संख्या ही २१ आहे़ तर, दुसरा डोस घेतलेल्या ७ लाख ४२ हजार ९२३ जणांपैकी डोस घेतल्यानंतर १५ दिवसांच्या आत मृत्यू झालेल्यांची संख्या ही २० आहे़ शहरात लसीच्या पहिल्या व दुसरा डोस घेतल्यानंतर, एकूण मृत्यूची संख्या ४१ इतकी आहे़ परंतु, यातील बहुतांशी मृत पावलेल्या व्यक्ती या अन्य आजाराने पहिल्यापासूनच ग्रस्त होत्या़ तसेच, यापैकी ९० रुग्ण हे वयाच्या ६० वरील आहेत़
------------------------------