सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर देखील आमदार अपात्रतेप्रकरणी निर्णय नाही, हा दुर्दैवी प्रकार; सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 02:34 PM2023-09-26T14:34:06+5:302023-09-26T14:35:23+5:30
शिवसेना पक्ष त्यांचे चिन्ह काढून घेण्याचे पाप शिंदे यांनी केले हे अत्यंत दुर्दैवी
इंदापूर : आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर तरी काही निर्णय होईल अशी आमची अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. ही बाब दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करत खा. सुप्रिया सुळे यांनी नाराजी जाहीर केली. इंदापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर सोमवारी ( दि.२५) त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, जी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी सुरु केली. ते हयात असताना तिची जबाबदारी त्यांनी उद्धव ठाकरेंवर दिली. हा निर्णय स्वतः बाळासाहेब ठाकरे यांचा होता, अशी पार्श्वभूमी असताना त्यांचा पक्ष, त्यांचे चिन्ह काढून घेण्याचे पाप शिंदे यांनी केले हे अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभणारे आहे.
पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्यावर कारवाई अत्यंत दुर्दैवी आहे. गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांनी भाजपसाठी जेवढे केले. तेवढे करणारे नेते महाराष्ट्रातील फार कमी असतील. मुंडे महाजन यांनी संघर्ष केला. सत्तेत नसताना पक्ष सत्तेत आणण्यासाठी कष्ट केले. त्यांनी मुलगी आत्ता लढते आहे, भाजपमध्ये आहे. त्या मुलीवर अन्याय करण्याचे पाप भाजप करतो आहे, त्याचा आपण जाहीर निषेध करतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त करुन सुळे म्हणाल्या की, दिल्लीमध्ये त्यांच्यातील एक खासदार होता, त्याचे नाव मला घ्यायचे नाही. त्यांचे घर याच प्रकारच्या अडचणीत सापडले होते. परंतु भाजप म्हणा किंवा कोणता तरी अदृश्य हात यांनी त्यांच्या घराचा लिलाव कसा थांबवला असा सवाल त्यांनी केला. एकीकडे बेटी बचाव, बेटी पढाव म्हणायचे, मग पंकजा मुंडे भाजपची लेक नाही का. आपण अश्या गोष्टीत कधीच राजकारण आणणार नाही. मात्र मुंडे यांच्या बाजूने असणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडी सरकारने इंदापूर तालुक्यातील रस्त्याच्या कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला तरी देखील निकृष्ट कामे होत असल्याच्या बाबीकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता अधिकची माहिती असेल तर द्या असे आवाहन खा.सुळे यांनी पत्रकारांना केले..बावडा भांडगाव या विवादित रस्त्याच्या कामाची करणार असल्याचा शब्द दिला होता. त्यानुसार त्या रस्त्याची पाहणी केली आहे. जिल्हाधिका-याबरोबर बोलणे झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. दीड वर्षापासून लांबलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेच्या निवडणुकांमुळे सामान्यांची कामे ठप्प झाली आहेत. निवडणूक लढवण्याची इच्छा असणारे आधी चर्चा करायचे, आता कोणी बोलत ही नाही. तिकीट ही मागत नाहीत,असे निरीक्षण सुळे यांनी नोंदवले. माझ्यापासून कोणी दुरावलेले नाही. माझ्याकडून कोणाला दुरावा नाही, असे मत व्यक्त करत विधानसभेसाठी उमेदवार कोण या प्रश्नाला उत्तर देताना आधी लोकसभा तर होवू द्या, असे उत्तर सुळे यांनी दिले.