पुणे : स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्यासोबतच चहा-कॉफी, साबण विकण्यास परवानगी देण्यात आली होती. मार्च २०२० मध्ये तसा शासन निर्णय घेण्यात आला होता. प्रत्यक्षात जिल्ह्यात रेशन दुकानांत चहा-कॉफी मिळत नसल्याचे चित्र आहे.
रेशन दुकानातून गहू, तांदूळ हे मिळत असताना यापुढे चहा, कॉफी, साबण, हॅण्डवॉश, वॉशिंग पावडर आणि शाम्पूही मिळणार आहे. राज्यातील ५२ हजार दुकानदारांना या वस्तूंची विक्री करण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले होते.
या वस्तू दुकानदारांनी स्थानिक पातळीवर स्वत: खरेदी करायच्या होत्या. त्याकरिता थेट कंपनीशी दुकानदारांनीच करार करायचा होता. यातून मिळणाऱ्या नफ्यावर सरकारचा हस्तक्षेप राहणार नाही. हा नफा थेट विक्रेत्यांना घेण्याची मुभा दिली होती.
शहरात ७१९, तर जिल्ह्यात १ हजार ८२३
पुणे शहरात रेशनची ७१९, तर जिल्ह्यात १ हजार ८२३ रेशन दुकाने आहेत. त्यात आता ४४१ नव्या दुकांनाची भर पडणार आहे.
रेशन कार्डधारक
जिल्ह्यात अन्न सुरक्षा योजना व प्राधान्य योजनेत २६ लाख ७१ हजार १५६ लाभार्थी आहेत, तर दोन्ही योजनांचे मिळून ५ लाख ८४ हजार ९०२ रेशन कार्ड आहेत.
कार्डधारक
अंत्योदय : ४९,३०९
प्राधान्य कुटुंब : ५,३५,५९३
सध्या रेशनवर काय मिळते?
शहर व जिल्ह्यातील रेशन कार्डांवर सध्या गहू व तांदूळ हे दोनच धान्य मिळतात.
अडीच वर्षांनंतरही चहा-कॉफी मिळेना
चहा- कॉफी विक्रीचा निर्णय होऊन अडीच वर्षे उलटली तरी रेशन दुकानांतून या वस्तूंची विक्री होत नसल्याचे चित्र आहे. हा निर्णय दुकानदारांना विश्वासात न घेता घेण्यात आला. त्यामुळे रेशन दुकानदारांकडून त्याला प्रतिसादच मिळाला नाही.
सरकारचे धोरण कळेना
राज्य सरकारने हा निर्णय दुकानदारांना विश्वासात न घेता घेतला होता. अनुदानावर या वस्तू विकणे शक्य नाही.
-गणेश डांगी, अध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना, पुणे शहर
अडचण काय?
या वस्तू विक्री करण्यास रेशन दुकानदारांना थेट अधिकार देण्यात आले. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यात पुरवठा विभागाचा कोणताही हस्तक्षेप नव्हता.
-सुरेखा माने, जिल्हा पुरवठा अधिकारी