लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आधुनिक जगतामध्ये मोबाइल म्हणजे प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. थेट संपर्कासाठी, वेळ वाचविण्यासाठी आणि मनोरंजनासाठीही मोबाईलचा वापर प्रचंड वाढला आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाइल दिसू लागला असला तरी लॅण्डलाईन, कॉइनबॉक्सची ‘ट्रिंग ट्रिंग’ही अजून सुरू असल्याचे दिसत आहे.
मोबाईल येण्यापूर्वी एक रुपयात कॉलची सुविधा देणारा कॉइन बॉक्स सर्वांना जवळचा वाटत होता. टपऱ्यांवर तसेच नाक्यानाक्यांवर बॉक्स नजरेस पडत. कॉइन बॉक्स येण्यापूर्वी लॅण्डलाईन सेवा चांगलीच प्रसिद्ध होती. त्याची भुरळ आजही लोकांना पडल्याशिवाय राहत नाही. पूर्वी मोजक्याच घरात लॅण्डलाईन असे. गरीब वस्त्यांमध्ये हे प्रमाण आणखी कमी असे. विविध प्रकारची दुकाने, रुग्णालये, हॉटेल्स, विविध कार्यालये, मेडिकल स्टोअर्स, बसस्थानके, रेल्वेस्थानके या ठिकाणी हमखास लँडलाईन आणि कॉईनबॉक्स दिसायचा. आता तो सरकारी कार्यालये, निमशासकीय कार्यालये, रुग्णालये, बस्थानके, रेल्वेस्थानके आदी सार्वजनिक ठिकाणीच बहुतांश वेळा दिसतो. क्वचित ठिकाणी कॉइन बॉक्सचे दर्शन होते. मात्र सेवा बंद असल्याचे सांगण्यात येते.
चौकट
पुणे जिल्ह्यात दोन लाखांपेक्षा अधिक लॅण्डलाईनचे ग्राहक आहेत. सध्याच्या घडीला इंटरनेटसाठी अधिक कनेक्शन घेण्याचा कल दिसून येतो. खासगी कार्यालयात लॅण्डलाईनला पसंती अधिक आहे.
चौकट
कॉइनबॉक्स बंद
कॉईन बॉक्सचा वापर बंद झाल्याने सेवा देणाऱ्या कंपन्यांनी ही सेवा बंद केली आहे, असे सांगण्यात येते.
कोट
कॉइन बॉक्स सेवा गेल्या १० ते १५ वर्षांपासून सुरू होती. जसे मोबाईल येऊ लागले, तसा ग्राहकांचा प्रतिसाद कमी होत गेला. त्यामुळे हा व्यवसाय बंद करणे भाग पडले. दुकानावर अजूनही याची माहिती असल्याने केवळ विचारणा होते. सर्वसामान्यांकडे मोबाईल आहे. त्यामुळे कॉइन बॉक्स सेवा बंद केली.
- हेमलता मुळे, कॉइन बॉक्स चालक
चौकट
म्हणून लॅण्डलाईन आवश्यकच
घरामध्ये तसेच ऑफिसमध्ये लॅण्डलाईन असणे महत्त्वाचे वाटते. आजच्या जगात संपर्कात असणे महत्त्वाचे आहे. मोबाईल जरी सोबत असला तरी तो गैर विश्वासू वाटतो. कधी रेजची तर बॅटरीची समस्या उद्भवू शकते. घरामध्ये लॅण्डलाईन असला तर घरच्या व्यक्तीला संपर्क करणे सहज होते.
- मकरंद सागर
चौकट
लॅण्डलाईन ही सेवा इंटरनेट वापरण्यासाठी घेतली आहे. इतर खासगी इंटरनेटपेक्षा सरकारी इंटरनेट सुविधा अधिक चांगली वाटते. इंटरनेटसह फोनची सुविधादेखील मिळते.
- योगेश यादव