पुणे : शिवसेनेचे गटनेते असलेल्या एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने राज्यात सध्या सत्ताधारी संकटात आले आहेत. विरोधी पक्षनेते असताना नारायण राणे शिवसेनेतून ११ आमदारांसह बाहेर पडले. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे शिवाजीनगर मतदारसंघातील आमदार विनायक निम्हण हेही सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क आणि मतदारसंघातील वर्चस्व यामुळे त्यांना मतदारसघामध्ये विरोध सहन करावा लागला नाही. उलट कोणी काही करण्याच्या हालचाली करत असल्याचे समजल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी उलट प्रतिहल्ला केला होता. तब्बल ४ वर्षे ते बाहेर काँग्रेसमध्ये होते. पण, सभागृहात शिवसेनेचे आमदार म्हणून विधानसभेची मुदत संपेपर्यंत राहिले होते.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचे म्हणून शशिकांत सुतार यांचे तिकीट कापून विनायक निम्हण यांना तिकीट दिले होते. लागोपाठ दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यावर नारायण राणे यांच्याबरोबर निम्हण यांनीही शिवसेना सोडली. त्यावेळी त्याचे सर्व लक्ष शिवाजीनगर मतदारसंघातच होते. शहराच्या राजकारणात ते फारसे लक्ष देत नसत. नारायण राणे यांच्याबरोबर विनायक निम्हण हे असल्याने सुरुवातीला शहर शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण, याची कुणकुण त्यांना लागताच त्यांनी पुढाकार घेणाऱ्यांवरच त्याच रात्री प्रतिहल्ला घडवून आणला होता.
पाषाण, शिवाजीनगर भागावर त्यांचे वर्चस्व होते. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांशी घरगुती संबंध प्रस्तापित केले होते. त्याचा परिणाम त्यांच्याविरोधात आंदोलन करणार असल्याचे त्यांच्यातीलच काही जण त्यांना सांगत असत. ही बंडखोरी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काही शिवसैनिक पाताळेश्वर येथे जमले होते. त्यांनी शिवाजीनगर येथील त्यांच्या कार्यालयाच्या बोर्डाला काळे फासण्याचे ठरवले. काही वेळातच त्यांना ही बातमी समजली. त्यांनी पाषाण येथील त्यांचे कार्यकर्त आणून कार्यालयाबाहेर ठेवले. शिवसैनिक तेथे येण्याअगोदरच या कार्यकर्त्यांनी त्यांना वाटेत गाठून प्रसाद दिला. त्यानंतर त्यांना शहरात विरोध झाला नाही. स्वत: विनायक निम्हण हे दुसऱ्या दिवशी कार्यालयात येऊन बसले होते. लोकांशी संपर्क साधत होते. नारायण राणे यांच्याबरोबरही काही आमदारांनी आमदारकीचा राजीनामा देऊन ते पुन्हा निवडून आले. परंतु, विनायक निम्हण यांनी राजीनामा न देता विधिमंडळात ते शिवसेनेचे सदस्य म्हणून विधिमंडळाची मुदत संपेपर्यंत राहिले. बाहेर मात्र ते काँग्रेसचे काम करत होते. त्यांच्या सुदैवाने पुढच्या निवडणुकीत विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि कोथरुड स्वतंत्र मतदारसंघ झाला. शिवाजीनगरला काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला बोपोडीचा भाग जोडला गेला आणि ते पुढच्या निवडणुकीत काँग्रेसकडून आमदार झाले.
नरेंद्र मोदी लाटेत विनायक निम्हण यांना २०१४ मध्ये भाजपच्या विजय काळे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर १० वर्षांनी पुन्हा त्यांची शिवसेनेत घरवापसी झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून पुणे शहरप्रमुखपदाची जबाबदारी दिली. काही काळ त्यांनी ही जबाबदारी पार पाडली. त्यानंतर त्यांनी शहरप्रमुखपदाचा राजीनामा दिला. आता त्यांनी सर्व लक्ष व्यवसायावर केंद्रित केले आहे. नारायण राणे यांच्याबरोबर शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेलेले निम्हण यांनी राणे यांच्या अगोदर काँग्रेस सोडून घरवापसी केली होती.