पुणे : मागील पावणेदोन वर्षांच्या कालावधीत कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यामुळे अनेक मोठे कारखाने, छोटे व्यवसायात मंदी आली होती. मात्र, याच काळात मोठ्या प्रमाणात गोदामे भाडेतत्वावर घेऊन धान्यासाठी मोठ्या प्रमाणात साठवणूक क्षमतेत वाढ केल्याने राज्य वखार महामंडळाला तब्बल ११० कोटी ७३ लाख रूपयांचा निव्वळ नफा झाला आहे.
राज्य वखार महामंडळाची गुरुवारी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्यानंतर महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. महामंडळाला २०२०-२१ या वर्षात ४२२ कोटी ४८ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे, तर २०१९-२० या काळात ३४० कोटी ६२ कोटी रुपये होते. त्यामुळे महामंडळाला कोरोनाच्या काळातही ११ कोटी ७३ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे.
राज्यात वखार महामंडळाची नऊ विभागीय केंद्रे असून २०४ वखारकेंद्रे आहेत. त्यामध्ये १२५० गोदामे आहेत. २०२० ते २१ या वर्षात महामंडळाने १२ नवीन गोदामाची बांधकामे पूर्ण केली. त्यात २३ हजार ६८० टनाची साठवणूक क्षमतेत वाढ केली. सद्यस्थितीत महामंडळाची साठवणूक क्षमता २२ लाख ३२ हजार टन एवढी क्षमता झाली आहे. एकूण साठवणूक क्षमतेपैकी १८.३३ लाख टन क्षमतेचा वापर केला आहे.
पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, बीड येथे जागा घेतली
''महामंडळाने कृषी गोदामे व लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील जांबरगाव येथे सुमारे २५ एकर जमीन तसेच पुणे जिल्ह्यातील आंबी येथे २५ एकर तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड, बीड जिल्ह्यातही जमीन खरेदी केली आहे. येथे आधुनिक पद्धतीचे गोदामे उभारणार आहे. तर एकूण सहा ठिकाणी १२ गोदामांचे बांधकाम सुरु केल्याचे राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे यांनी सांगितले.''
''२०१९-२० या काळात ६६ कोटी ३६ लाख एवढा होता. कोरोना काळात लॉकडाऊन असताना सरकारकडून तूर, कापूस, हरभरा, उडीद या डाळींची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरु होती. वखार महामंडळाची गोदामाची क्षमता १८ लाख टन एवढी होती. गोदामे कमी पडत असल्याने बाहेरील ३७० गोदामे भाडेतत्वावर घेऊन साठवणुकीची क्षमता २३ लाख टनापर्यंत वाढविली. त्यामुळे नफा झाला असल्याचेते म्हणाले आहेत.''