पुणे : इंजिनिअरिंग, फार्मसी आणि अॅग्रिकल्चर या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथमवर्ष प्रवेशासाठी येत्या १० मे रोजी प्रवेश पूर्वपरीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय झाला आहे, या निर्णयावर सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी टीका केली आहे.आजपर्यंत गेली अनेक वर्षे बारावीनंतर कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी १२ वीचे बोर्डाचे गुण आधारभूत होते. कोणतीही सीईटी त्यासाठी घेतली जात नव्हती. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे ते फक्त बारावी बोर्डचा अभ्यास करत होते. मात्र अचानक महाराष्ट्र सीईटी सेलने यंदापासून बारावीनंतर कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. ही सीईटी अभियांत्रिकी, फार्मसीसाठी घेतली जाते, तीच सीईटी असणार आहे. ही परीक्षा १० मे रोजी होणार असून त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत २५ मार्च आहे. कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर प्रवेश घेतात आणि आजवरच्या प्रथेप्रमाणे त्यांनी फक्त १२ वी बोर्ड परीक्षेचा अभ्यास केला आहे. आता अचानक केवळ ४ महिने अगोदर त्यांना कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी सीईटी द्यावी लागणार आहे. हा निर्णय एक वर्ष आधी घोषित करणे शक्य होते. मात्र तो अशा प्रकारे फक्त चार महिने आधी घोषित करणे हे प्रशासनाची असंवेदनशील वृत्ती दाखवते. इंजिनिअरिंग, फार्मसीसाठीच्या सीईटीसाठी ११ वी आणि १२ वी असा दोन्ही वर्षांचा अभ्यासक्रम असणार आहे हे लक्षात घेतले आणि याच परीक्षेच्या तयारीसाठी ज्यांना इंजिनिअरिंग, फार्मसीला प्रवेश घ्यायचा आहे ती मुले ११ वी पासून तयारी सुरु करतात, क्लास लावतात हे लक्षात घेतले तर कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना हा किती मोठा धक्का आहे, हे समजू शकते. आज वर या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत होते आता आता शेतकऱ्यांची मुले आत्महत्या करतील, अशी टीका विवेक वेलणकर यांनी केली आहे. सगळ्यात दुर्दैवाचा भाग म्हणजे आपल्याला अशी सीईटी द्यावी लागणार आहे हे सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना (विशेषत: ग्रामीण भागातील) समजणार नाही आणि त्यांनी वेळेत अर्ज भरला नाही तर त्यांची कृषी पदवी प्रवेशाची संधी हुकु शकते. त्यामुळे किमान यंदा तरी अशी सीईटी देणे सक्तीचे करू नये, अशी मागणी सजग नागरिक मंचातर्फे करण्यात आली आहे.
...तर शेतकऱ्यांची मुलेही आत्महत्या करतील; ‘सीईटी’च्या निर्णयावर सजग नागरिक मंचाची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:54 AM
इंजिनिअरिंग, फार्मसी आणि अॅग्रिकल्चर या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथमवर्ष प्रवेशासाठी येत्या १० मे रोजी प्रवेश पूर्वपरीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय झाला आहे, या निर्णयावर सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी टीका केली आहे.
ठळक मुद्दे'अशा प्रकारे फक्त चार महिने आधी निर्णय घोषित करणे ही प्रशासनाची असंवेदनशील वृत्ती' किमान यंदा तरी अशी सीईटी देणे सक्तीचे करू नये : सजग नागरिक मंच