पिंपरी : प्रत्येकाला वाटतं की आपला वाढदिवस हा अविस्मरणीय झाला पाहिजे. मात्र, सध्या तरी कोरोनाच्या काळात अनेक नियम असताना घरीच वाढदिवस साजरे करण्यापलीकडे काही पर्याय राहिलेला नाही. त्याचप्रमाणे गेल्या तीन महिन्यांपासून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपल्या जीवाचाी पर्वा न करता दिवसरात्र रस्त्यांवर उभ्या असलेल्या पोलिसांना देखील कुटुंब, वाढदिवस आहेच की... परंतु, कर्तव्यास प्राधान्य देणा या बांधव परिस्थितीतून मार्ग काढत आनंद मिळवत असतात. पण एका पोलिसाला त्याच्या वाढदिवसाला मिळालेले सरप्राईज त्यांचा हा वाढदिवस अविस्मरणीय करुन गेले.
गृहमंत्री देशमुख सोमवारी (दि. ८) सकाळी पुणे येथून मुंबईला जात होते. त्यासाठी ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच त्यांच्या प्रवासाच्या मार्गावर पोलिसांकडून पायलटिंग सुरू होते. पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर किवळे फाटा ते अमृतांजन पॉईंट दरम्यान पौंड येथील पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव त्यांच्या सहकाऱ्यांसह पायलटिंग करीत होते.
उपनिरीक्षक जाधव यांचा वाढदिवस असून त्यांना शुभेच्छा देण्याबाबत त्यांच्या मित्रांनी गृहमंत्री देशमुख यांच्याशी चर्चा केली. आपण सर्वांनी त्यांचा वाढदिवस साजरा करूया, असे त्यावेळी देशमुख यांनी सुचविले. त्यानंतर सकाळी नऊच्या सुमारास किवळे फाटा येथे त्यांचा ताफा थांबला. उपनिरीक्षक जाधव यांच्या मित्रांनी लगेचच केक मागविला. एका चारचाकी वाहनावर केक ठेवण्यात आला. फिजिकल डिस्टन्सिंग पाळत गृहमंत्री देशमुख यांच्या उपस्थितीत उपनिरीक्षक जाधव यांनी केक कापला. देशमुख यांनी जाधव यांना केक भरवला. कोरोनाच्या संकटकाळात तुम्ही तुमचे कार्य एक योद्धा म्हणून पार पाडत आहात. त्यामुळे पोलिसांचा अभिमान आहे, असे म्हणून देशमुख यांनी जाधव यांना शुभेच्छा दिल्या.
उपनिरीक्षक जाधव याबाबत म्हणाले, मित्रांनी मला दिलेले हे सरप्राईज आहे. त्यांनी विनंती केल्यामुळे गृहमंत्री यांनी माझा वाढदिवस साजरा केला. हे सर्व अचानक घडले. याची मला कल्पना नव्हती. मात्र त्यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला. हा वाढदिवस अविस्मरणीय झाला.
खुद्द गृहमंत्री यांनी त्यांचा ताफा थांबविला. रस्त्यावर एका पोलिसाला केक भरवला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच पोलिसांच्या कामाचे देखील गृहमंत्री यांनी कौतुक केल्याचे पाहून तेथे उपस्थित इतर पोलिसांनाही खूप आनंद झाला. त्यांच्याकडून देखील उपनिरीक्षक जाधव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.