बारामती: कोणत्याही संस्थेची आर्थिक ताकत वाढविण्यासाठी शेअर्सची रक्कम वाढविली जाते. बारामतीबँकेबाबत देखील मान्यता घेऊन शेअर्स रक्कम वाढवावी लागेल. पुर्वजांनी संस्थेच्या लावलेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. त्यामुळे बारामती बँकेची विश्वासार्हता नावलौकिक वाढविण्यासाठी संचालकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.
बारामती सहकारी बँकेच्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी पवार पुढे म्हणाले, संस्थांना आर्थिक शिस्त लावण्यासाठी वाईटपणा घ्यावा लागतो. ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित राहण्यासाठी ‘आरबीआय’ची बंधने आहेत. त्याचे पालन करुन बारामती बँकेचा ‘बँकिंग’ मध्ये नावलौकिक वाढवण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करुया. बारामतीच्या नावाला गालबोट न लागता साजेसे काम करुन सर्वांगीण सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत. संचालकांनी सभासदांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊन देता कामा नये.
बँकेच्या सर्व शाखांच्या कामकाजावर अधिक लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि कार्यकारी संचालकांनी त्यावर नजर ठेवावी. कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या ग्राहकांशी कामकाजाबाबत संवाद ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे. बँकेच्या ई मेल वर येणाऱ्या मेलची दररोज नोंद घ्यावी. त्याचा रोज निपटारा करा, थातुरमातूर काम चालणार नाही. मागील काळातील चुकांची दुरुस्ती करा. अगदी अजित पवार थकीत असेल, तरी त्याच्यावर नियमानुसार वसुलीची कारवाई करा, असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला.
यावेळी बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव यांनी सभासदांसाठी ६ टक्के लाभांश जाहीर केला. अहवाल वर्षात बँकेच्या ठेवींमध्ये १२.९२ कोटींनी वाढ झाली आहे. सर्व शाखांच्या खातेदारांकडुन युपीआय पेमेंटच्या मदतीने रोज २५ हजार पेक्षा जास्त व्यवहार होत आहेत. बँकेच्या सभासदांची मुले परदेशात जाऊन उ्च्च शिक्षण घेण्यासाठी बँक खारीचा वाटा उचलणार आहे. याबाबत सुविधा सुरु करण्यात आली असल्याचे सातव म्हणाले.
...आईला भेटायला जातो, पण फोटो काढत नाही
बारामती बँकेच्या वेगवेगळ्या ठीकाणी शाखा सुरु होत आहेत.त्यावेळी बँकेत नोकरी लागण्याची वेळ येते.त्यावेळी नोकरीसाठी बँकेत संधी मिळाल्यानंतर काही दिवसांनी त्यांचे आईवडील,पालक येतात.दहा वर्ष माझा मुलगा,सुन,जावई बारामती सोडुन राहिले आहेत.त्यांना येथे आणण्यासाठी आग्रह धरला जातो.त्यांना येथे आणा...आणा...आणा.मात्र, येथे जागा शिल्लक नाहि..नाहि...नाहि.तुम्ही मला काटेवाडीतून मुंबईला पाठविले.मी कधी रडतो का,इथे यायचय...यायचय...अशा पध्दतीने यमक जुळवत मिश्कील टीप्पणी अजित पवार यांनी केली. आईला भेटायला जातो,पण फोटो काढत नसल्याचा देखील टोला विरोधी पक्षनेते पवार यांनी पंतप्रधानांचे नाव न घेता लगावला.