बारामती :पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतींनी पथदिव्यांचे ५२५ कोटींचे वीजबिल थकवले आहे. यामध्ये ३१८ कोटी मूळ थकबाकी व २०७ कोटी रुपयांचे व्याज आहे. या व्याजाला सवलत देण्याचा राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. परंतु ब्रम्हदेव आला तरी ही विजबिले माफ केली जाणार नाहीत. बिले भरावीच लागतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले.
बारामती तालुक्यातील थोपटेवाडी ग्रामपंचायतीने नवीन पथदिव्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन दिले होते. यावर त्यांनी हे विधान करत वीज बिल भरावेच लागेल असे स्पष्ट केले. शेतीपंपाच्या वीज बिल वसुलीसाठी मागील महिन्यात महावितरणने विद्युत रोहित्र बंद करण्याचा सपाटा लावला होता. मोठ्या विरोधानंतर मार्च महिन्यांपर्यंत वीज कनेक्शन न तोडण्याचा निर्णय महावितरणने घेतला.
सुपेतच विमानतळ-
बारामती शहरातील विकासकामे मोठ्या गतीने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर नव्याने स्थापन झालेल्या माळेगाव नगरपंचायतीचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच सुपे परिसरातदेखील मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. विमानतळाबाबत कोणतीही चर्चा सुरू असली तरी पुणे जिल्ह्याला मिळणारे विमानतळ हे सुपे परिसरातच असेल, अशी माहिती पवार यांनी दिली.