कसब्यातील राजकीय हायहोल्टेज पोटनिवडणुकीत भाजपला धूळ चारत विजय खेचून आणणारे काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर यांची सध्या राज्यभरात चर्चा होत आहे. तब्बल २८ वर्षांनंतर काँग्रेसनं कसब्यात भाजपचा पराभव केला असून त्यात रविंद्र धंगेकर यांचा सिंहाचा वाटा असल्याच्या चर्चा आहे.
रविंद्र धंगेकर कधीही चार चाकीमध्ये बसत नाहीत यामागचं रहस्य विचारलं असता ते म्हणाले की फोर व्हिलरमध्ये जायला वेळ लागतो. टू व्हिलरवर लवकर पोहचतो आणि लोकांची काम होतात असे धंगेकर म्हणाले. तसेच मी आमदार झालो असलो तरी बाईक सोडणार नाही. टू व्हिलरवर लोकांना सहज भेटता येतं आणि लोक पण हक्काने भेटून कामं सांगतात, असं रविंद्र धंगेकर यांनी सांगितलं.
रविंद्र धंगेकर यांचा शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असा त्रिकोणी राजकीय प्रवास झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी धंगेकरांची ओळख राहिली आहे. मनसेमध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या पदावर काम केलं. इथंच त्यांची राजकीय कारकीर्द फुलली. रविंद्र धंगेकर हे कसब्यात मागील २५ वर्षांपासून नगरसेवक होते. त्यामुळे जनतेचा कायम त्यांना पाठिंबा राहिला आहे. त्यासोबतच ते सामान्यांचे नेते आहेत. रात्रीबेरात्री नागरिकांच्या कामाला धावून जातात, अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळे सामन्यांपासून उच्चभ्रू लोकापर्यंत ते सगळ्यांचे लाडके नेते आहे.
कसब्यात रविंद्र धंगेकर विजयी होतील याची खात्री नव्हती-
कसब्यात यश मिळेल असे सामान्य लोकांकडून ऐकायला मिळत होते. पण मला त्याची खात्री नव्हती. नारायणपेठ, सदाशिवपेठ आणि शनिवारपेठ हा भाजपचा गड आहे. त्यामुळे कसब्यात विजय होईल की नाही याची खात्री नव्हती, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सांगितले. कसब्यात गिरीश बापट यांनी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केले होते. ते लोकांमध्ये असायचे. त्यांचे भाजप आणि त्यांच्या परिवाराशी घनिष्ट संबंध होते. पण भाजपाशी संबंध नसलेल्यांशीही त्यांचे मैत्रीचे संबंध होते. त्यामुळेच त्यांचे लक्ष असलेला मतदारसंघ जड जाईल असे वाटत होते. पण या उमेदवाराचे काम परिणामकारक ठरले. हा उमेदवार कधीच चारचाकीत बसत नाही. सतत दुचाकीवर बसून लोकांच्या संपर्कात असतो. त्यामुळे दोन पायांवर चालणाऱ्यांनी यांना मते दिली, असे शरद पवार म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"