लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “कोरोना संसर्गाची त्या-त्या जिल्ह्यातील स्थिती कशी आहे यावर निर्बंध कोणते आणि किती हे अवलंबून असेल. प्रत्येक जिल्ह्यासाठीची स्थिती वेगळी असू शकते. साथ कमी झाल्याचे आकडेवारीतून दिसत असले तर निर्बंध काही प्रमाणात शिथिल करता येतील. मात्र सर्व निर्बंध तत्काळ उठवण्याची स्थिती आजही नाही,” असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
कोरोना उपचाराचा ‘प्रोटोकॉल’ पाळला गेला नाही तर काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे यासंबंधीच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जावे, असा प्रयत्न असल्याचे टोपे म्हणाले. शुक्रवारी (दि. २८) ते पुण्यातील साखर संकुल येथे पत्रकारांशी बोलत होते.
कोरोना होऊन गेल्यानंतर आता म्युकरमायकोसिससारखा आजार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत विचारले असता टोपे म्हणाले, “कोरोनावरील उपचारांचे नियम ठरवून दिले आहेत. त्यानुसार रुग्णाच्या कोणत्या स्थितीत कोणती औषधे द्यायची हे निश्चित आहे. याच पद्धतीने उपचार व्हावेत यासाठी डॉक्टरांना वारंवार सांगण्यात येते. प्रशिक्षणही घेतले जाते. उपचाराची औषधे, त्याचे प्रमाण आदीत फरक पडत असेल तर कदाचित त्याचे परिणाम होऊ शकतात.”
कोरोनापश्चात स्थितीमध्ये काहींना उच्च रक्तदाबाचा विळखा पडलेला दिसतो. याचे कारण बदललेली जीवनशैली असल्याचे टोपे म्हणाले. मुंबईसह अनेक शहरांमध्ये या विकाराने ग्रासलेल्यांची संख्या वाढत आहे. जीवनशैली बदलणे, ताण कमी करणे हाच त्यावरचा उपाय असल्याचे ते म्हणाले.