पुणे: माझा आणि राहुल गांधी यांच्या बापाचा बाप आला तरी संविधान बदलता येणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. विधानसभा निवडणुकीसाठी आयाेजित प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची जाहीर सभा मंगळवारी पुण्यात पार पडली. या प्रसंगी मंत्री आठवले बाेलत हाेते. ‘ज्या जिल्ह्याने जुळविली मने, त्या जिल्ह्याचे नाव आहे पुणे’ अशी कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
आठवले म्हणाले की, माझ्या रिपब्लिकन पक्षाला जागा मिळाल्या नसतील; पण हे सगळे उमेदवार माझेच आहेत. महाविकास आघाडी ही झोपेत असून, त्यांना माहिती नाही आम्ही काय तयारी केली ते. जसा देश बदलता येणार नाही तसेच संविधान बदलता येणार नाही. शरद पवार यांना मी सांगितले होते की, तुम्ही नरेंद्र मोदी यांच्यासोबत या कारण विकासाला गती दिली पाहिजे, असेही आठवले म्हणाले.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, देशातील सर्वाधिक भेटी पुण्याला देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी असून, त्यांचे पुण्यावर विशेष प्रेम आहे. काँग्रेसने देशात गरिबी हटवली नाही; पण मोदी सरकारने दहा वर्षांत २५ कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या वर आणले. विमानतळ संख्या १५७ पर्यंत वाढवली. नवे १६ एम्स सुरू करण्यात आले. दिवसाला २८ किमी नवे रस्ते तयार होत आहेत. अयोध्या राम मंदिर तयार झाले, जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवले गेले. दहा वर्षांत महाराष्ट्राला दहा लाख कोटी रुपये केंद्र सरकारकडून दिले गेले आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार मेधा कुलकर्णी यांचेही भाषण झाले. भाजपच्या माजी नगरसेविका गायत्री खडके यांनी सूत्रसंचालन, तर शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी प्रास्ताविक केले.
निम्मा निधी योजनांवर जाणार, मग विकास कसा करणार?
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. लाडकी बहीण याेजनेचा २ कोटी ३० लाख महिलांना लाभ मिळाला आहे. सरकारला मिळणाऱ्या साडेसहा लाख कोटींपैकी निम्मा निधी शासकीय पगारावर जातो आणि बाकी निधी विकासकामासाठी वापरला जातो. पण महाविकास आघाडीने पंचसूत्रीतून ज्या घोषणा केल्या त्यासाठी तीन लाख कोटी रुपये लागत आहेत. ते जनतेची केवळ दिशाभूल करत आहेत. ते विकास कसा साधणार याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट करावी.