कोरोनामुळे पुण्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा गेल्या काही महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे शाळेच्या वर्गखोल्यांची दररोज स्वच्छता होत नाही, तसेच शाळेच्या परिसरात वाढणारे गवत वेळच्या वेळी काढले जात नाही. परिणामी, काही शाळांना झाडा-झुडपांनी वेढले आहे. त्यातही पुणे जिल्ह्यातील काही तालुके आदिवासी भागात मोडतात. त्यामुळे या भागात विंचू व सापांचा धोका अधिक आहे. मात्र, सर्व मुख्याध्यापकांना शाळेची स्वच्छता ठेवण्याबाबत सूचना दिल्या असल्याचे शिक्षण अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
------------------------
जबाबदारी कोणाची?
ग्रामीण भागातील बहुतांश शाळांसाठी शिपाई हे पदच मंजूर नाही. त्यामुळे शाळांची स्वच्छता विद्यार्थी व शिक्षक स्वत:च करतात. मात्र, शाळा बंद असल्याने एक महिना ते पंधरा दिवसांनंतर शाळांची स्वच्छता केली जाते. शाळेच्या मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी शाळेच्या स्वच्छतेची जबाबदारी घेणे अपेक्षित आहे, असे शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.
---------------------------------
वर्गखोल्यांतून धूळ हटेना...
ग्रामीण भागातील काही शाळांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यातच सुमारे दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने, शाळांमधील वर्गात धूळ साचली आहे. दररोज वर्गखोल्या स्वच्छ केल्या जात नसल्याने धूळ हटत नाही.
---------------------------
जिल्ह्यातील शाळा बंद असल्या, तरी शिक्षकांना शाळेतील ५० टक्के उपस्थिती बंधनकारक आहे. त्यामुळे एखाद्या शाळेत दोन शिक्षक असतील, तर त्यातील एक शिक्षक दररोज शाळेतून आणि दुसरे शिक्षक घरातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करतात. त्यामुळे शाळेच्या वर्गखोल्या स्वच्छ असून, कोणालाही विंचू किंवा सापापासून धोका नाही.
- स्मिता गौड, प्राथमिक शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.
------------------------
तालुकानिहाय जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या
तालुका विद्यार्थी
आंबेगाव २३४
बारामती २७८
भोर २७४
दौंड २९०
हवेली २२६
जुन्नर ३५१
खेड ४०२
मावळ २७४
मुळशी २१४
पुरंदर २१८
शिरूर ३५८
वेल्हा १४३