पुणे : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला; पण, कुणी व्यंगात्मक बोलले तरी दम भरला जातोय. आम्ही केवळ हे अस्वस्थपणे बघत राहणार आहोत का, आता भारतातील लोकशाही केवळ चार माणसे जिवंत ठेवू शकणार नाहीत, तर सामान्य माणसाचा सहभाग देखील वाढला पाहिजे आणि त्याची सुरुवात झाली आहे, असे ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी सांगितले. माणसाची वृत्ती ही विचार व बदल घडविण्याची आहे. पण माणसांना मारायचा प्रकार चालू आहे. लोकशाही नैतिक मूल्यांची बूज राखायला हवी याचे भान सुटले आहे, असेही ते म्हणाले.
थोर समाजवादी लोकनेते भाई वैद्य यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेना यांच्यातर्फे भाई वैद्य यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा ‘लोकनेते भाई वैद्य स्मृतिगौरव पुरस्कार २०२५’ या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. हा पुरस्कार लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांना देण्यात आला. मात्र, प्रकृती अस्वस्थतेमुळे त्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकल्या नाहीत. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, भाई वैद्य फाउंडेशन व आरोग्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिजीत वैद्य, फाउंडेशनच्या चिटणीस प्रा. डॉ. गीतांजली वैद्य, आरोग्य सेनेचे सरचिटणीस लक्ष्मीकांत मुंदडा आदी मान्यवर उपस्थित होते.
लक्ष्मीकांत देशमुख यांनी विचार मांडले. सत्कारमूर्ती डॉ. तारा भवाळकर यांनी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला. समाजवादी विचार ही एक जीवनसरणी आहे. ती नुसती राजकीय विचारधारा नसून, तो एक जीवन प्रवाह आहे, असे सांगून डॉ. भवाळकर म्हणाल्या, सत्ताधारी आपली सत्ता टिकवण्यासाठी धर्माचा आधार घेतात आणि हे फक्त भारतातच नाही, तर जगामधल्या अनेक देशांमध्ये आता हा एक प्रवाह येतो आहे, असे आपल्याला दिसून येईल. धर्माच्या पाठीमागे लोक जातात आणि धार्मिक गोष्टींच्या मागे जातात असे म्हटले की, बाकीच्या सगळ्या जीवनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष होते, असे त्या म्हणाल्या.