पुणे : राज्यात खरिपाच्या पेरण्या जवळपास आटोपल्या आहेत. तरीही अनेक जिल्ह्यांत कर्जवाटपाचा आकडा समाधानकारक नाही. मात्र, पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ७२ टक्के खातेदारांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यात कर्जवाटपाचे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत चांगले आहे. यंदा सुमारे ७३ टक्के पीक कर्जवाटप झाले आहे. त्यात जिल्हा बॅंकेने आघाडी घेतली असून, आतापर्यंत उद्दिष्टाच्या ८९ टक्के कर्जवाटप करण्यात आले आहे. सरकारी बॅंकांनीही गेल्या महिन्याच्या तुलनेत कर्जाचे प्रमाण वाढवले असून, आतापर्यंत उद्दिष्टाच्या ५१ टक्के कर्जवाटप केले आहे.
खरिपाच्या ६५ टक्के पेरण्या पूर्ण
जिल्ह्यात पाऊस थांबल्याने भात लागवडीला वेग आला आहे. घाटमाथ्यांवर लावणीची कामे वाढल्याने एकंदरीत जिल्ह्याच्या पेरणीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
कोणाचे कर्जवाटप किती? (कोटींत)
बॅंक उद्दिष्ट सभासद कर्जवाटप टक्केवारी
जिल्हा बॅंक १८०१.५८ २०४८०० १६००.८५ ८८.८५
सरकारी बॅंका ६७६.७२ १७९५१ ३४७.२३ ५१.३२
खासगी बॅंका ३६१.८४ ३४८७ ११७.२१ ३२.३९
ग्रामीण बॅंक ३.३३ १६२ २.३२ ४४.७२
वाटप गेल्यावर्षीपेक्षा वाढले
जिल्ह्यात यंदा कर्जवाटपाचे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत सुधारले आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ६९ टक्के होते. ते यंदा ३ टक्क्यांनी वाढून ७२ टक्क्यांवर पोहोचले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २०६७.६१ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप झाले आहे.
जिल्ह्यात यंदा कर्जवाटपाचे काम चांगले झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पीककर्ज घेतले नसेल, त्यांनी जवळच्या शाखेत संपर्क साधावा.
- श्रीकांत कारेगावकर, मुख्य व्यवस्थापक, अग्रणी बॅंक, महाराष्ट्र बॅंक