पुणे: “मराठी साहित्य संमेलन असो, नाट्य संमेलन असो किंवा विश्व मराठी साहित्य संमेलन असो, तिथे वाद निर्माण होतोच. संमेलन आणि वाद हे समीकरणच झाले. खरंतर मराठी माणासाचा वाद घालणे हा स्वभावच आहे. कारण आपण संवेदनशील, भावनाप्रधान लोक आहोत, त्यामळे वाद-प्रतिवाद हा झालाच पाहिजे. यातूनच खऱ्या अर्थाने मंथन होऊन चांगले काही तरी समोर येते, त्यामुळे वाद झाले तरी संमेलन होत राहतील,” असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर शुक्रवारपासून (दि.३१) तिसरे विश्व मराठी संमेलन सुरू झाले. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचा साहित्यभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, भाषामंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. राजा दीक्षित, रवींद्र शोभणे, मनीषा म्हैसकर आदी उपस्थित होते.
मी पुन्हा येईन !
‘‘‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य आता माझा पिच्छाच सोडत नाहीय. पण हल्ली चांगल्या अर्थाने हे शब्द बोलले जातात. काही काळापूर्वी हे उपहासाने म्हणायचे. एखादा शब्द जेव्हा आपल्याला चिकटतो, तेव्हा काळ आणि वेळेनुसार त्याचे अर्थ देखील बदलत जातात. पण विश्व मराठी संमेलनासाठी आज आलेल्या लोकांनी हे ठरविले पाहिजे की, जेव्हा जेव्हा विश्व मराठी संमेलन भरवले जाईल, तेव्हा तेव्हा ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन…’ असे म्हणावे,”अशी खुमासदार फटकेबाजी फडणवीस यांनी केली.
अशा प्रकारचे संमेलन आपण करत राहायचे
‘‘संमेलनावर वाद निर्माण करणे हा आपला स्थायीभाव आहे. हे मी म्हणत नसून आठव्या शतकात लिहिलेल्या एका पुस्तकात आहे. मराठी माणसाचे विविध गुण आणि अवगुण देखील त्यात आहेत. मराठी माणसाला कलह करायला आवडतो, हे आठव्या शतकात लिहून ठेवलेले आहे. त्यामुळे तुम्ही फार काळजी करू नका, अशा प्रकारचे संमेलन आपण करत राहायचे, अशी ठाम भूमिका फडणवीस यांनी घेतली.
साहित्यासाठी ‘एआय’ वापरा !
सध्या ‘एआय’चा बोलबाला आहे. आपण ‘एआय’च्या युगात आहोत, जर आपण या ठिकाणी ‘स्मॉल लँग्वेज मॉडेल’मध्ये सर्व साहित्यिकांचे साहित्य टाकले, तर येणाऱ्या पिढीला साहित्यिकांनी काय लिहिले आहे, हे समजेल. हे काम मराठी भाषा विभागाने करावे, त्यासाठी एआयचा वापर करावा, अशी सूचनाही फडणवीस यांनी केली.
परदेशातही संमेलन करू !
मराठी माणूस जगाच्या पाठीवर पोचला आहे. मला आनंद आहे की, आपण एकत्रित आहोत. आता हे विश्व संमेलन आपण परदेशातही करूया. त्यासाठी कुठलं शहर किंवा देश सोयीचे असेल, त्यावर चर्चा करू, असे सांगून परदेशात मराठी संमेलन घेऊन मराठी भाषेचा डंका सातासमुद्रापार वाजवू, असेही फडणवीस म्हणाले.