‘असू जायबंदी जरी...’;जखमी सैनिकांची भावना : देशासाठी प्राण देण्याची आजही तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 04:52 PM2018-01-27T16:52:07+5:302018-01-27T16:56:35+5:30
माजी सैनिकांच्या निवासस्थानी जाऊन ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल, अमित बागूल व अन्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. निमित्त होते प्रजासत्ताकदिनाचे.
पुणे : लक्ष्मीनगर येथील कृष्णा सावंत, धानोरीतील आनंदराव घोडेस्वार, येरवडा येथील नरसिंग शिंदे तसेच गोरख जाधव, जे. एस. देसाई....., सगळे युद्धात जखमी झाल्यामुळे सैन्यातून निवृत्त झालेले. या सर्वांमध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे आजही सैन्यात जाऊन शत्रुशी दोन हात करण्याची त्यांची तयारी आहे. त्यांच्या या जिद्दीलाच प्रजासत्ताकदिनी युवा कार्यकर्त्यांनी सलाम केला व तुमच्यातील देशप्रेमाचा अंश युवापिढीत येऊ द्या अशी प्रार्थनाही केली.
ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल, अमित बागूल व अन्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. निमित्त होते प्रजासत्ताकदिनाचे. या सर्व माजी सैनिकांच्या निवासस्थानी जाऊन या कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्या सर्वांनीच वेगवेगळे असतानाही देशासाठी आजही सिमेवर जाऊन लढण्याची तयारी असल्याचे सांगितले. त्यांच्यातील हे साम्य पाहून सागर आरोळे, महेश ढवळे, अभिषेक बागुल, इम्तियाज तांबोळी, धनंजय कांबळे, समीर शिंदे, योगेश निकाळजे, अशोक शिंदे, विक्रांत गायकवाड, दीपक देशपांडे हे कार्यकर्तेही भारावून गेले.
या शूरवीरांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी रांगोळीचा सडा, भारत मातेच्या प्रतिमेची प्रतिकृती उभारूली व त्यांच्या घरासमोर राष्ट्रीय ध्वज उभारून जवानाच्या शौर्यप्रती आदर व्यक्त केला. जायबंदी असतानाही सर्वजण लष्कराच्या पेहरावात व छातीवर शौर्यपदके लावून उपस्थित होते हे विशेष! आबा बागूल यांच्या हस्ते त्यांना स्मृतीचिन्ह देण्यात आले. प्रजासत्ताकदिनी झालेला हा सन्मान आमच्या व कुुटंबीयांच्या कायमच्या स्मरणात राहील अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केली. देशासाठी लढून शारीरिक अंपगत्व पत्करणाऱ्या शूर जवानांपासून प्रेरणा मिळावी यासाठी हा उपक्रम आयोजित केला असल्याचे बागूल यांनी सांगितले.
एकात्मता रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रजासत्ताक दिनानिमीत्त दरवर्षी प्रमाणे यंदाही राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलपासून दत्तवाडी पोलीस स्टेशनपर्यंत काढण्यात आलेल्या एकात्मता रॅलीला नागरिकांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविधतेतील एकतेचे दर्शन घडविणारे मुलांचे पेहराव, हातात तिरंगा व जयहिंदचा नारा यामुळे ही रॅली लक्षवेधी ठरली.