पुणे : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी कायम दिल्लीला यायचे,. मेट्रोच्या कामाचा उत्साहाने पाठपुरावा करायचे. कोरोना महामारीनंतरही मेट्रोचे काम गतीने पूर्ण झाले. मेट्रोमुळे प्रवास सोपा होईल, वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होईल. २५ हजार टन कार्बन डाय आॅक्साईडचे उत्सर्जन रोखता येईल. शहरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत असल्याने २०३० पर्यंत शहरी लोकसंख्या ६० कोटींचा टप्पा पार करेल. शहरांमध्ये उड्डाणपुलांची संख्या मर्यादेपेक्षा जास्त वाढवता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हाच एकमेव सशक्त पर्याय आहे. त्यामुळे तुम्ही श्रीमंत, उच्चभ्रू असाल तरी सुजाण नागरिकांनी मेट्रोची सवय लावून घ्यावी, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी, ६ मार्च रोजी महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे अनावरण तसेच विविध विकासकामांच्या उदघाटनासाठी पुणे शहरात आले होते. महापालिकेत शिवरायांच्या पुतळयाचे अनावरण झाल्यावर मोदी यांनी गरवारे मेट्रो स्थानकाजवळ उदघाटन करत गरवारे ते आनंदनगरपर्यंतचा प्रवास मेट्रोतून केला. त्यानंतर एमआयटी कॉलेजच्या मैदानावर मोदींची जाहीर सभा पार पडली. यावेळी मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्प आणि नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे उदघाटन, १४० ई-बस आणि ई-डेपोचे लोकार्पण, आर.के.लक्ष्मण गॅलरीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
मोदींच्या भाषणाला मराठीतून सुरुवात, दिग्गजांचे स्मरण!
‘छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे यांच्यासह अनेक प्रतिभाशाली, साहित्यिक, कलाकार, समाजसेवक यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पुण्यनगरीतील माझ्या बंधू-भगिनींना नमस्कार’ अशा शब्दांत मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. पुण्याचे ऐतिहासिक महत्व त्यांनी अधोरेखित केले. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, सेनापती बापट, गोपाळ कृष्ण गोखले, म.गो.रानडे, आर.जी.भांडारकर, चापेकर बंधू यांचेही त्यांनी स्मरण केले. मोदींनी रामभाऊ म्हाळगी यांच्या पुण्यतिथीचा उल्लेख करत, ‘बाबासाहेब पुरंदरे यांची आठवण येते आहे’, असा उल्लेख मोदींनी यावेळी केला आहे.
शहरातील सुविधांवर भर
शहरे आधुनिक करताना अनेक सुविधांवर भर द्यावा लागेल. प्रत्येक शहरात जास्तीत जास्त पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था निर्माण व्हावी, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली. इलेक्ट्रिक बस, चारचाकी, दुचाकी यांची संख्या वाढावी, स्मार्ट सुविधांसाठी इंटिग्रेटेड कमांड आणि कंट्रोल सेंटर असावीत, आधुनिक घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा, पर्यायी मैलापाणी शुध्दीकरण यंत्रणा, ‘वेस्ट टू वेल्थ’ निर्माण करणारे प्रकल्प, उर्जा निर्मिती प्रकल्प असावेत, पथदिवे एलईडी असावेत, पेयजल आणि सांडपाण्याची सुयोग्य व्यवस्था अशा अनेक योजनांवर काम सुरु आहे.