विवेक भुसे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोंढवा येथील एक ६० वर्षांच्या महिला घरातच असतात. त्यांना प्रकृतीमुळे चालणे शक्य नसल्याने त्या घराबाहेर जात नाहीत. अशात एके दिवशी त्यांना बँकेचा मेसेज येतो, तुमच्या खात्यातून एटीएमद्वारे २० हजार रुपये काढले गेले आहेत. त्यांना धक्का बसतो. आपण तर घरीच आहोत. आपले कार्डही आपल्याकडे असताना परस्पर कसे काय पैसे काढले गेले. तुमच्या कार्डची माहिती मिळवून त्याद्वारे तुमच्या कार्डचे क्लोन तयार करून त्यामार्फत सायबर चोरटे अशा प्रकारे हजारो लोकांची फसवणूक करत आहेत.
तुमच्या कार्डची माहिती अनेकदा तुमच्या नकळत तसेच मोबाइलवरील फ्री गेमअॅप, ऑनलाइन पेमेंट अॅप डाऊन केल्यानंतर अशी फसवणूक होत आहे. अनेक अॅपमध्ये ऑटो रीड ओटीपीची परवानगी घेतली जाते. त्यातून असे प्रकार घडत असतात. त्यामुळे फ्री गेम, अनोळखी अॅप डाऊनलोड करण्याचे टाळा, असे आवाहन करण्यात येत आहे.
याबाबत सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांनी सांगितले की, कार्डशिवाय होणा-या फसवणुकीत अनेकांना तुमच्या नकळत कार्ड स्कीमरमार्फत स्वाइप करून त्यावरील माहिती काढून घेतली जाते. तुम्ही हॉटेलमध्ये, पेट्रोल पंपावर कार्डमार्फत पेमेंट करताना तेथील कर्मचारी नकळत तुमचे कार्ड स्कीमरवरून फिरवतो. त्यावेळी सर्व डाटा त्याच्याकडे गोळा होतो. तो डाटा सायबर चोरटे विकत घेतात. त्याद्वारे क्लोन कार्ड करून तुमच्या बँक खात्यावर डल्ला मारला जातो. यापूर्वीच्या काही गुन्ह्यांमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचारी, पंचतारांकित हॉटेलमधील वेटर यांनी अशा प्रकारे ग्राहकांच्या कार्डची माहिती चोरून पुरविल्याचे उघडकीस आले आहे. त्याबरोबर अनेक सायबर चोरटे हे एटीएमच्या कार्ड आत टाकण्याच्या ठिकाणी स्कीमर लावतात. त्यात तुम्ही पैसे काढण्यासाठी कार्ड टाकले की तुमच्या कार्डवरील सर्व माहिती रीड होते. तसेच त्याचवेळी तेथे छोटा पिन कॅमेरा लावलेला असतो. त्यात तुम्ही तेथील कीबोर्डवर टाईप केलेला पासवर्ड रेकॉर्ड होतो. त्यावरूनही क्लोन कार्ड बनवून फसवणूक केली जाते.
अनेक वेगवेगळी मोबाइल अॅप आपल्याला फ्री असल्याचे सांगून डाऊनलोड करायला भाग पडले जाते. मात्र, गरज नसताना तसेच अनोळखी अॅप डाऊनलोड करू नका.
------------
फसवणुकीचा प्रकार २०२० ९ मे २१ पर्यंत
कार्डमार्फत होणारी फसवणूक ४६१९ ११९५
कार्डशिवाय होणारी फसवणूक ९६९ २९५
एकूण बँक फसवणूक ८५०६ २६७६
.....
पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच
सायबर चोरट्यांनी एकदा तुमच्या बँक खात्यातील पैशांवर डल्ला मारता की ते तुमचा पैसा लगेच दुस-या, तिस-या खात्यात ट्रान्सफर करतात. ही खाती दुस-या वेगळ्या बँकेतील, तसेच वेगळ्या शहरातील असतात. त्यामुळे तुमचा पैसे या बँकच्या या खात्यात गेला याची माहिती समजेपर्यंत तो पैसा पुन्हा पुढच्या बँकेच्या खात्यात हस्तांतरीत झालेला असतो. त्यामुळे शेवटी अतिशय कमी पैसा हाती लागतो.
९९ टक्के पैसे दिले परत मिळवून
ब-याचदा फसवणुकीत गेलेला पैसा परत मिळणे अवघड असते. तरीही एका गुन्ह्यामध्ये पुणे सायबर पोलिसांना फसवणूक झालेल्या गुन्ह्यातील ९९ टक्के पैसे परत मिळवून देण्यात यश आले होते.
सायबर पोलीस ठाण्याने परत मिळवून दिलेली रक्कम
२०१९- ९ कोटी ७ लाख ९० हजार ८९३
२०२० - ११ कोटी ३९ लाख ३५ हजार ३५९
१२ जून २१पर्यंत - १ कोटी ७६ लाख २ हजार ४५९
.....
लक्षपूर्वक कार्डचा वापर हवा
आपण डेबिट अथवा क्रेडिट कार्डचा वापर करताना त्याकडे सर्व लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे. अनेक जण मोबाइलवर बोलत दुसरीकडे कर्मचा-याकडे कार्ड देऊन पासवर्डही त्याच्या समोरच दाबत असतात. कार्डचा वापर करताना ‘एकावेळी एकच काम’ या तत्त्वाचे कटाक्षाने पालन करा. आपले कार्ड घेऊन ते नजर चुकवून दुसरीकडे कोणत्या मशिनमध्ये ठेवत नाही ना याकडे लक्ष ठेवा. शिवाय पासवर्ड टाईप करताना कर्मचा-याच्या तो लक्षात येईल, अशा पद्धतीने टाइप करू नका़.
- मच्छिंद्र पंडित, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, पुणे