पुणे : कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात बुधवारी कोरोनाग्रस्त रुग्णांचा आतापर्यंतचा उच्चांकी आकडा नोंदवला गेला. अशा परिस्थितीत लसीकरण हा सध्या संरक्षणाचा एकमेव उपाय मानला जात आहे. मात्र, लस कोणी घ्यावी आणि कोणी घेऊ नये, याबाबत अजूनही सामान्यांमध्ये बऱ्याच शंका आहेत. गर्भवती महिला, सर्दी-खोकला यांसारखी लक्षणे असलेले रुग्ण, केमोथेरपीचे उपचार सुरू असलेले रुग्ण, सध्या कोरोनाग्रस्त असलेले रुग्ण वगळता सर्वांनी लस घ्यायलाच हवी असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रक्त पातळ करण्याच्या गोळ्या सुरु असलेल्या रुग्णांची आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलतळ्रून लस घ्यावी.
हृदयरोगी, रक्त पातळ होण्याच्या गोळ्या घेणारे, वेगवेगळी ॲलर्जी असलेले असा कुठलाही आजार असलेल्या सर्वांनीच कोरोना प्रतिबंधक लस घ्यायला हवी, त्यांना कोठलाही धोका नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याबाबत शासनाने मार्गदर्शन सूचनाही जारी केल्या आहेत. त्याप्रमाणे आपापल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन लसीसंदर्भातील शंकांचे निरसन करून घ्यावे, असे वैद्यकतज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
--
लस घेऊ शकत नाही, असे खूप कमी आजार यादीत नोंदवले गेले आहेत. कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. आपल्या आजूबाजूला कोरोना नाहीच, अशा आविर्भावात लोक सार्वजनिक ठिकाणी वावरत आहेत. ८०-९० टक्के लोकांमध्ये लसीकरण झाल्याशिवाय आपल्याकडे हर्ड इम्युनिटी येणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करुन घेण्यावर भर द्यावा. केमोथेरपीसारखे उपचार, सर्दी, खोकला यांसारखी लक्षणे आणि गर्भवती महिलांनी यांनी लस घेऊ नये.
- डॉ. अच्युत जोशी, जनरल फिजिशियन
---
कोरोनाचा उद्रेक दिसत असताना लसीकरण हा सध्याचा एकमेव पर्याय आहे. आपल्याकडील लोकसंख्येचा विचार करता जास्तीत जास्त लोकांपर्यंत लस पोहोचणे गरजेचे आहे. मधुमेहाच्या रुग्णांमधील प्रतिकारशक्ती क्षीण झालेली असते. त्यांना संसर्गाचा जास्त धोका असतो. त्यामुळे मधुमेहाच्या ४५ वर्षावरील सर्व व्यक्तींनी लस प्राधान्याने घ्यायला हवी. रुग्णांना अँटीकॉग्युलंट गोळया सुरु असतील तर त्यांनी लसीच्या दोन-तीन दिवस आधी ती औषधे थांबवावीत. प्रत्येक रुग्णाने लसीकरणापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
- डॉ. अमित वाळिंबे, मधुमेह रोगतज्ज्ञ
---
रक्त पातळ होण्याची किंवा गुठळी प्रतिबंधक गोळया सुरु असल्यास लसीकरणाच्या दोन दिवस आधी गोळया थांबवाव्यात. लसीकरणानंतर एक-दोन दिवसांनी गोळया पुन्हा सुरु कराव्यात. ह्रदयरोग, रक्तदाब, कोलेस्टेरॉलच्या गोळया सुरु असतील तर लस घ्यायला काहीच हरकत नाही आणि या गोळया थांबवण्याचीही गरज नाही. कोणताही अत्यवस्थ रुग्ण किंवा एक-दोन दिवसांत बायपास, अँजिओप्लास्टीसारखी शस्त्रक्रिया असलेल्या रुग्णांनी लगेच त्याच दिवशी लस घेऊ नये. बायपास सर्जरीनंतर रक्त पातळ होण्याच्या गोळया बंद केल्या =जातात, तर अॅजिओप्लास्टीनंतर गोळया वाढवल्या जातात. धातूची झडप घातली असल्यास गुठळी प्रतिबंधक गोळया दिल्या जातात. अशा रुग्णांना लगेच लसीकरण करुन घेता येत नाही. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक ठरतो.
- डॉ. अभिजीत वैद्य, ह्रदयरोगतज्ज्ञ
---
थंडी-ताप आला तरी घाबरू नये...
लसीकरणानंतर थंडी ताप आला तरी घाबरण्याचे कारण नाही. लसीकरणानंतर घेतलेल्या गोळ्या वेळेत घ्याव्यात, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.