बावडा (ता. इंदापूर): ‘बघतोच तुला बघून घेतो. स्वाभिमानाला काय खपत नाही. वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही. स्वार्थासाठी बाप बदलला तर जनतेला पटत नाही. घड्याळ जरी चोरलं तुम्ही तरी वेळ मात्र आमचीच आहे. जॅकेट घाला नाहीतर योजना काढा. हवा फक्त पवार साहेबांची आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शरदचंद्र पवार (Sharad Pawar) यांच्या पाठीशी उभा राहून तुतारी वाजवणारा माणूस दिसला पाहिजे,’ असे मत खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी व्यक्त केले. सराटी (ता. इंदापूर) येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेत ते बोलत होते.
‘जोपर्यंत मुंबईच सरकार यांच्या हातून जात नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाचा देशात पराभव होणार नाही. म्हणून उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला सत्तेतून दूर करण्यासाठी दिल्लीच्या सरकारला शेवटचा धक्का मारण्यासाठी आपल्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा तुतारी वाजवायची आहे,’ असे प्रतिपादन (दि. ११) शिवस्वराज्य यात्रा इंदापूर तालुक्यातील सराटी येथे आल्यानंतर जिजामाता विद्यालय मैदानावर आयोजित जाहीर सभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले.
यावेळी खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने, यशवंत गोसावी, तेजसिंह पाटील, महारुद्र पाटील, भरत शहा, अमोल भिसे, विलास माने, रोहित मोहोळकर, सागर मिसाळ, अशोक घोगरे, नंदकुमार रणवरे, प्रदीप जगदाळे, विष्णुपंत देवकाते, प्रताप पालवे, छायाताई पडळकर आदी उपस्थित होते.
राज्यात सरकार बदलणार आहे
या राज्यात हवा बदलणार आहे, म्हणजे सरकार बदलणार आहे. तुमच्या मनातलं तुम्हाला हवं असं तुमची सेवा करणारं सरकार आणणार आहे. कांद्याला भाव आम्ही देणार. आमचं सरकार आल्यावर नुसते पंधराशे रुपये देणारच, परंतु त्याच्यापुढे जाऊन या राज्यातील कुठलीही लेक जेव्हा घराच्या बाहेर जाईल, ती घरी परत येईपर्यंत तिची जबाबदारी आमच्या सरकारची असेल. तिची सुरक्षितता ही आमची जबाबदारी असेल, असे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)म्हणाल्या.