पुणे: मुंबई आणि ठाणे शहराच्या धर्तीवर पुणे शहरातही सर्वंकष स्वच्छता (डीप क्लीनिंग) केली जाईल. त्यामध्ये धार्मिक स्थळे, तीर्थक्षेत्रांच्या स्वच्छतेबरोबरच रस्ते, पदपथ, दुभाजक आदी स्वच्छ करून पाण्याने धुण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, येत्या आठवडाभरात या स्वच्छतेला सुरुवात करावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महापालिकेला दिले आहे.
राज्यातील धार्मिक स्थळांमध्ये स्वच्छता अभियान राबविणे, शहरी आणि ग्रामीण भागातील डीप क्लीनिंग मोहीम आणि महिला सशक्तीकरण अभियान याविषयीची आढावा बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. याला पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमनार, घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांच्यासह महापालिकेच्या सर्व विभागांचे उपायुक्त ऑनलाइन सहभागी झाले होते. अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमनार यांनी ही माहिती दिली.
अशी राबविणार माेहीम :
- डीप क्लीनिंग मोहिमेत शहरातील धार्मिक स्थळे, तीर्थक्षेत्रांच्या परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबविणार.- शहरातील आदर्श रस्ते योजनेत निवडलेले प्रमुख १५ रस्ते, महत्त्वाचे चौक या ठिकाणीही केली जाणार स्वच्छता.
- पाण्याच्या उच्च दाबाच्या फवाऱ्याने धुतले जाणार रस्ते, पदपथ आणि दुभाजक.- रस्त्यावरील कचरा, माती हटविण्याबाबत दिला जाणार भर.
- अनधिकृत फलक, होर्डिंग काढले जातील.
गरजेनुसार एकाच वेळी सर्व यंत्रणा एकाच ठिकाणी राबवून स्वच्छता केली जाणार आहे. ही मोहीम राबविण्यासंदर्भात महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या आहेत. मंगळवारी सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे सहायक आयुक्त, महापालिकेचे उपायुक्त व विभागप्रमुखांची बैठक घेण्यात येईल. त्यानुसार, ही मोहीम राबविली जाणार आहे.- डॉ.कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त.