मोरे म्हणाले, ‘‘श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याचा ताण संस्थानासह प्रशासकीय यंत्रणेवरही येत असल्या, तरी देशाचा व राज्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी शासन व प्रशासन खंबीर पणे पाठीशी निश्चितपणे उभे राहिलेले आहे. यामध्ये पालखी तळांचा प्रश्न असेल, पालखी महामार्गाचा विकास तीर्थक्षेत्रांचा विकास ही महत्त्वपूर्ण कामे केली आहेतच; याशिवाय आषाढी वारीच्या दरम्यान जवळपास महिनाभर वारकऱ्यांच्या सेवेशी दिवस-रात्र हजर असल्याचे जाणवते. दिवसेंदिवस भाविक वाढत आहेत, त्यांच्यासाठी सध्याचे पालखी तळ कमी पडत आहेत.गेल्या दोन-तीन वर्षांत यांचा विकास केला जात आहे. त्यांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी दगडूशेठ हलवाई ट्रस्ट, वनराई, देवराई, विश्व हिंदू परिषद यांसारख्या संस्थांचा सहभाग आहे. वारी दरम्यान पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न असतो. हा प्रश्न शासनाने लोकसहभागातून व विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न झाला आहे. आरोग्यविषयक वारकऱ्यांमध्ये अजूनही जागरुकता वाढण्याची गरज आहे. हे करताना वारीची परंपरा जपणे हे मोठे आव्हान आहे. अलीकडे वारीचे स्वरूप बदलत असून गर्दी होत आहे. पूर्वी वारीसमवेत लोक कमी असत. त्यामुळे गरजाही कमी होत्या. पालखी वेगात पुढे सरकत होती. अलीकडे पालखीसमवेत भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पालखीचा वेग प्रचंड मंदावत असून, पुढील मुक्कामी पालखी वेळेत नेणे हे मोठे आव्हान ठरत आहे. भविष्यात याच्यावर विचार करणे आवश्यक होणार आहे. यासाठी संस्थानच्या पालखी सोहळ्यासमवेत सध्याच्या ३३२ दिंड्या चालत आहेत. वारीचे नियोजन करण्यासाठी सोहळ्यात नव्याने दिंड्यांचा समावेश करणे बंद केले आहे. सोहळ्यासाठी भाविक पूर्वी पायी येत होता. आत्ता मात्र वाहनांची संख्या वाढली आहे. हे भाविक आपापल्या गावी परत जात असताना परतीच्या प्रवासात अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. हा प्रश्नही ऐरणीवर आहे. आधुनिकतेची कास धरत असताना जग अधिक जवळ आले आहे.वारी व्हॉट्स अॅप व फेसबुकच्या माध्यमातून जलद गतीने जगभर पसरत आहे. यातून आपला सांस्कृतिक वारसा जगापुढे जात आहे. ही चांगली बाब आहे. यासाठी संस्थानानेही फेसबुक दिंडीसारखा उपक्रम हाती घेतला आहे. सध्या समाजाला भेडसावत असलेले स्त्रीभ्रूणहत्या, पर्यावरणरक्षण हे उपक्रम विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने राबविले जात आहेत. यासाठी निर्मल वारी, हरित वारी व महिला सन्मान करण्यासाठी ‘ती’ची वारी असे विविध उपक्रम राबविले जात आहे. हरित वारी राबवीत असताना सर्वच पालखी तळावर वृक्षारोपण केले जात आहे.महिलांसाठी सन्मान व्हावा यासाठी ‘ती’ची वारी डिजिटल पद्धतीने समाजासमोर मांडली जात आहे. निर्मल वारी आरएसएसच्या पुढाकाराने राबविली जात असून, यासाठी शासनाने तीन कोटी रुपये मंजूर करून हातभार लावला आहे. वारीची वाटचाल सुरू होत आजूबाजूच्या गावांतही गर्दीचे प्रमाण वाढले आहे.सध्या शासनाने फक्त पालखी तळांचाच विकास लक्षात घेतला आहे. परंतु पालखीसोबत असलेले भाविक हे पालखी मुक्कामाच्या गावांच्या पाच किलोमीटरच्या परिघातील गावांमध्ये विकास होणे आवश्यक आहे. भविष्यात शासनाने याचाही विचार करणे आवश्यक आहे, असे मत मोरे यांनी व्यक्त केले.
आधुनिकतेतही सोहळ्यात वाढ
By admin | Published: June 19, 2017 5:16 AM