पुणे : शेतकरी कर्जमाफी योजना यशस्वी करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत असलेल्या सहकार विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक सुट्या पुन्हा एकदा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आहे. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होऊन महिना उलटून गेला; मात्र अद्यापही दुसरी यादी जाहीर झालेली नाही. पहिल्या टप्प्यातील यादीमध्येही मोठ्या प्रमाणावर त्रुटी राहिल्याने सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकलेले नाहीत. आयटी विभागाच्या चुकांमुळे कर्जमाफीला वेळ लागत असल्याचे चित्र आहे. पहिल्या यादीतील त्रुटी दूर करून ही निर्दोष यादी शासनाला पाठविण्यात आली आहे. दुसºया हिरव्या यादीचे काम वेगाने सुरू आहे. त्यामध्ये उद्भवणाऱ्या अडचणी दूर करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांकडून कर्जमाफीला लागत असलेल्या विलंबामुळे टीका होऊ लागली आहे. त्यामुळे सहकार विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभागाची धावपळ सुरू आहे. या याद्यांच्या कामासाठी हातात वेळ कमी राहिला असून अधिवेशनापूर्वी दुसरी यादी जाहीर करून त्यांना कर्जमाफी देण्याचा प्रयत्न शासन स्तरावर सुरू आहे. त्यामुळे सहकार विभागावर कामाचा प्रचंड त्राण आहे. सध्या सहकार विभागातील उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी कर्जमाफीच्या कामामध्ये गुंतले आहेत.चार महिन्यांपासून या विभागातील अधिकारी हे कर्जमाफीच्या कामाला जुंपलेले आहेत. यापूर्वीही त्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या होत्या. सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे यांनी सुट्या रद्द करण्याचा आदेश दिल्याने आणखीनच अस्वस्थता वाढली आहे. शुक्रवारी ईद-ए-मिलादची जाहीर झालेली शासकीय सुटी रद्द करण्यात आली आहे.रविवारीही कर्जमाफी योजनेचे काम करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आदेश झाडे यांनी दिले आहेत. त्यामुळे जोडून आलेल्या सुट्या उपभोगता येणार नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
रविवारीही कामावर या...! कर्जमाफीसाठी सहकार विभागाच्या सुट्या पुन्हा एकदा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 12:45 PM
सहकार विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक सुट्या पुन्हा एकदा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत.
ठळक मुद्देसार्वजनिक सुट्या पुन्हा एकदा रद्द करण्यात आल्याने अधिकारी व कर्मचारी अस्वस्थशुक्रवारी ईद-ए-मिलादची जाहीर झालेली शासकीय सुटीही रद्द