पुणे : हवेत जरासा गारवा अन् हातात गरमागरम कॉफीचा कप... आजूबाजूला वृक्षांच्या पानांची सळसळ अन् पक्ष्यांचा चिवचिवाट... त्यातच समोर अवतरला उंचपुरा, अतिशय देखणा असा भारतीय क्रिकेटचा द वॉल म्हणून जगभर गाजलेला राहुल द्रविड. त्याला पाहून उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला आणि मग राहुलजी कसे आहात? असे बोलून मनमोकळ्या गप्पांना सुरुवात झाली. हा अनुभव शुक्रवारी भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिरात आला.
निमित्त होते ‘कॅनव्हास ते वॉल’ या पुस्तकाचे प्रकाशन व ई-बुकचे अनावरण. हे पुस्तक राहुल द्रविडची आई डॉ. पुष्पा द्रविड यांच्या जीवनप्रवासावर आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत कुठेही राहुल द्रविड कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे नमूद नव्हते. कारण तो येणार नसल्याचे नक्की होते. खुद्द डॉ. पुष्पा द्रविड यांनाही राहुल येणार आहे, याची माहिती नव्हती. परंतु, आपल्या आईच्या पुस्तकाचे प्रकाशन आहे आणि मुलगा येणार नाही, असे होणे अशक्यच होते. शुक्रवारी सायंकाळी बरोबर ६ वाजता राहुल द्रविड अचानक अवतरला. अंगात फिक्कट निळ्या रंगाचा बारीक रेषा असलेला शर्ट आणि निळी पॅन्ट अशा फॉर्मलमध्ये तो आला. जागतिक कीर्ती लाभली असली, तरी तो मी सेलिब्रेटी नाही, या अविर्भावातच वावरत होता. सर्वांशी मराठीत गप्पा मारत होता.
राहुल द्रविड कार्यक्रमाला येणार म्हटल्यावर प्रचंड गर्दी झाली असती, म्हणून निमंत्रण पत्रिकेत नाव देण्याचे टाळले. कारण या कार्यक्रमाला आईचे कर्तृत्व पुस्तक रूपात समोर येणार होते. त्यात द वॉलची लुडबूड कशाला? अशीच कदाचित राहुलची अपेक्षा असावी. म्हणूनच त्याने कोणालाही काहीही कळू न देता या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. पुस्तक प्रकाशनालाही व्यासपीठावर न बसता समोरील रांगेत बसून आईच्या कर्तृत्वाचा सोहळा तो अनुभवत होता. त्याच्या डोळ्यात आईविषयीचे प्रेम, वात्सल्य, कौतुक जाणवत होते.
...हेच मी माझ्या आईकडून शिकलो
हातात घेतलेल्या कामावर एकाग्रचित्ताने टिकून राहायचं, ते सोडून द्यायचं नाही, हेच मी माझ्या आईकडून शिकलो. तिच्यातलं धैर्य, शांत वृत्ती आणि सबुरी, कोणतीही गोष्ट धीराने घ्यायची ही गोष्ट शिकलो. - राहुल द्रविड, माजी क्रिकेटपटू