पुणे: मुळची रिक्षा निरा येथे असताना त्या रिक्षाची नंबर प्लेट लावून ती रिक्षा पुणे शहरात राजरोजपणे फिरत होती. वाहतूक शाखेने या रिक्षावर ई चलान फाडले. ते चलान मुळ रिक्षामालकाला पाठविले. त्यातून पुण्यात बनावट नंबर प्लेट लावून रिक्षा फिरत असल्याचे आढळून आले आहे.
श्रीकांत मोहन वेळेकर (वय ३६, रा. महात्मा गांधी वसाहत, शिवाजीनगर ) याला अटक केली आहे. याबाबत राजेंद्र चंद्रकांत बोराटे (वय ५०, रा. निरा) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे निरा परिसरात रिक्षा व्यवसाय करतात. त्यांची रिक्षा निरा येथे असताना त्यांना पुण्यात रिक्षावर दंड केल्याचे चलान मिळाले. त्यांनी आझाद रिक्षा चालक संघअनेचे संस्थापक अध्यक्ष शफिक पटेल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी खडकी वाहतूक विभागाला हे कळविले.
श्रीकांत वेळेकर याने रिक्षेवर बनावट नंबरप्लेट लावून व्यवसाय सुुरु केला. २१ मे रोजी सकाळी अकरा वाजता तो खडकीतील पोल्ट्री चौकात आला होता. त्यावेळी त्याच्याकडे लायसन्स नव्हते तसेच विना गणवेश तो रिक्षा चालवत होता, म्हणून वाहतूक पोलिसांनी त्यांच्या नंबरप्लेटवरुन त्याच्यावर ई चलानचा १ हजार रुपयांचा दंड केला. त्याचा मेसेज फिर्यादी यांना गेला. तो पाहून ते आश्चर्यचकीत झाले. त्यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी श्रीकांत वेळेकर याचा शोध घेऊन अटक केली. पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम तपास करीत आहेत.