पुणे: रंगभूमी हे कलेचे प्राचीन माध्यम आहे. रंगभूमीसमोर चित्रपट, दूरचित्रवाणी अशा अनेक माध्यमांची आव्हाने आली. तेव्हा रंगभूमीचे अस्तित्व संपुष्टात येईल असे वाटले होते. पण तसे काही झाले नाही. आता इंटरनेटला कंटाळलेली युवा पिढीही रंगभूमीकडे वळू इच्छित आहे. त्यामुळे इंटरनेटचं आव्हान जरी असलं तरी जेव्हा तरूणाईला कंटाळा येईल. तेव्हा पुन्हा रंगभूमी बहरलेली दिसेल, असा आशावाद प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयीयांनी व्यक्त केला.
एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दूरचित्रवाणी, चित्रपट, मालिका अन ओटीटीच्या जमान्यात रंगभूमीचे अस्तित्व टिकेल कि नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जाते, त्यावर भाष्य करताना बाजपेयी म्हणाले, रंगभूमीसमोर अनेक आव्हानं आली. त्यातील एक होते चित्रपट माध्यम. तेव्हा रंगमंचाचे अस्तित्व संपुष्टात येईल असं वाटलं होतं. पण रंगभूमीवरील कलाकारांची प्रतिभा पाहिली तर या मंचावर काम केलेलेकलाकार आजही लोकांच्या स्मरणात आहेत. त्यांचं योगदान मोठं आहे. हे कळतं. त्यानंतर दूरचित्रवाणी, इंटरनेट माध्यमे आली. पण ज्या ज्या शहरात गेलो तिथं नाट्यसंस्था सक्रिय झालेल्या दिसत आहेत. इंटरनेटला कंटाळलेली युवा पिढी रंगभूमीकडे वळत आहे ही सकारात्मक बाब आहे.
एक आहे की कलाकार व्हायचं असेल तर समोर दूरचित्रवाणी, चित्रपट अथवा कुठलं ओटीटी प्लँटफॉर्म आहे याचा विचार करु नये. त्यापेक्षा दोन ते तीन वर्ष समर्पित भावनेने काम शिकण्याला प्राधान्य दिले पाहिजे. काम शिकलात तर अधिक वर्षे टिकून राहू शकता. सुरुवातीलाच चांगले काम करायला लागल्यानंतर स्पर्धा किंवा व्यावसायिक क्षेत्राचा रस्ता धरला तर अधिक काळ तग धरू शकणार नाहीत . शिकणं खूप महत्वाचं आहे असा सल्लाही त्यांनीनवोदितांना दिला.
अनेक दिग्गज कलावंताबरोबर काम केल्याचा अनुभव कसा होता? याविषयी विचारले असता मनोज बाजपेयी म्हणाले, ज्यांचा अभिनय बघून लहानाचे मोठे झालो. जे आपले आदर्श आहेत. ज्यांना केवळ पडद्यावरच पाहिले आहे. असे दिग्गज कलाकार जेव्हा सहकलाकार म्हणून समोर येतात तेव्हा स्वत:च्या भाग्यावर विश्वास बसत नाही. इतकी वर्ष काम करून ते टिकून राहिले आहेत. रसिकांच्या हदयात त्यांनी स्थान मिळविले आहे. रसिकांना त्यांच्यात काहीतरी वेगळे जाणवले. म्हणूनच त्यांच्यावर रसिक इतके प्रेम करतात. अनेक पिढ्यांनी त्यांना पाहिलं आणि पसंत केलं. त्यांच्याकडून खूपकाही शिकायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले.