श्रीकिशन काळे
पुणे : ‘तो’ पिंजऱ्यातील ओंडक्यावर, मचाणावर अतिशय लीलया वावरतो. कुठेही धडकत नाही. भलेही त्याला दोन्ही डोळ्याने दिसत नाही, तरी देखील कान आणि नाक हेच त्याचे डोळे बनले आहेत. त्याचे नाव ‘गणेश’ असून, त्याची दृष्टी जाऊन दहा वर्षे झाली. पण तो अंध आहे, असे त्याला पाहून अजिबात वाटत नाही. नाक आणि कान हे दोन्ही अवयव सजग ठेवून तो रूबाबात वावरतो. दृष्टी नसली तरी जगण्याची, शिकण्याची जिद्द असल्याने त्याचे आयुष्य सोपं झालं आहे. हा गणेश म्हणजे १३ वर्षांचा बिबट आहे.
माणिकडोह बिबट निवारा केंद्रात येऊन नुकतीच त्याला दहा वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त त्याची देखभाल होत असलेल्या माणिकडोह बिबट निवारा केंद्राला भेट दिली आणि त्याच्याविषयी जाणून घेतले. जुन्नरचे उपवनसंरक्षक जयराम गौडा आणि केंद्रातील वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बनगर यांनी याविषयी माहिती दिली.
‘गणेश’ हा नाशिक जिल्ह्यातील एका गावात जखमी अवस्थेत रेस्क्यू केलेला बिबट आहे. २०११ मध्ये एका गावात चुकून तो आला होता. तेव्हा बिबटविषयी अधिक जनजागृती झालेली नव्हती. म्हणून मानव-बिबट संघर्ष तिथे झाला. नागरिकांनी लाठी, बांबूने त्याला मारले आणि तो त्यात गंभीर जखमी झाला. त्या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला होता आणि त्याच्या दोन्ही डोळ्यांना जबर मार बसला होता. काही दिवसांनी त्याच्या एका डोळ्यामध्ये इन्फेक्शन होऊन तो निकामी झाला असल्याने शस्त्रक्रिया करून काढावा लागला, अशी डॉ. निखिल बनगर यांनी दिली. वन विभाग आणि वाइल्डलाइफ एसओएस संस्था मिळून त्याची देखभाल करत आहेत.
दोघांची दोस्ती मस्त...
या गणेशचा एक दोस्त असून, त्याचे नाव विठ्ठल आहे. दोघेही एका पिंजऱ्यात असून, त्यांच्यात चांगली गट्टी आहे. विठ्ठल हा देखील जखमी अवस्थेत केंद्रात आणला होता. तो एका ट्रॅपमध्ये अडकल्याने त्याच्या मागील एका पायाचा पंजाच निकामी झालेला. त्यामुळे तो पंजा कापावा लागला. कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात सोडता येत नाही, म्हणून माणिकडोह बिबट निवारा केंद्रात वन विभाग आणि वाइल्डलाइफ एसओएसचे कर्मचारी बिबट्यांचे संगोपन करत आहेत.
सध्या केंद्रात एकूण ३४ बिबटे आहेत. यात काही मानव-बिबट संघर्षात पकडलेले, अनाथ, अपंग तसेच वयस्कर अशा बिबट्यांना ठेवण्यात आले आहे. मानव-बिबट संघर्ष कमी होण्यासाठी वन विभाग आणि वाइल्डलाइफ एसओएसचे कर्मचारी मिळून प्रयत्न करीत आहोत असे माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बनगर यांनी सांगितले.
बिबट निवारा केंद्रात अतिशय उत्तम प्रकारे बिबट्यांची निखा राखली जाते. जुन्नर परिसरातील मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. हा संघर्ष कमी झालेला असून, त्यासाठी नागरिकांचेही सहकार्य लाभले आहे. केंद्रातील अपंग बिबट्यांची खास सोय केल्याने त्यांचे जीवनही सुसह्य झाले आहे असे जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. जयराम गौडा यांनी सांगितले.