पुणे : राजकारण केवळ पदांसाठी नाही तर माेठ्या ध्येयासाठी केले जाते. युवा वर्गाने राजकारणात यावे. मी माजी मुख्यमंत्री असलो, तरी नाकारला गेलेला नाही. जनतेने नाकारले तर लाेक राजकारण साेडतात. मात्र, आजही मी जेथे जाताे तेथे लाेक मला मामा म्हणून प्रेम करतात. जनतेचे प्रेम हीच खरी संपत्ती आहे. मी पद साेडलं म्हणजे राजकारण करणार नाही असे नाही, तर पुढेही राजकारण करत राहणार, असा निर्धार मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केला. अजून बरीच कामे बाकी असून ती पूर्ण करायचे आहेत, असेही ते म्हणाले.
एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित १३ व्या भारतीय छात्र संसदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. या वेळी डॉ. ज्ञानवत्सल स्वामी, लोकसत्ता चळवळीचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश नारायण, एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड, ज्येष्ठ संगणकतज्ञ डॉ. विजय भटकर, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस उपस्थित होते.
चाैहान म्हणाले की, मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी हाेणार नाही असे विश्लेषक सांगायचे. तेव्हा माझ्या पक्षाचे नेतेही जिंकणे अवघड आहे, असे बाेलत. मी मात्र याने खचलाे नाही. पक्षाला विजयी करणारच, असा निश्चय करून अहाेरात्र काम केले. निकाल आला तेव्हा भाजपने आतापर्यंतचे सर्वात जास्त मते घेतली आणि जागाही जिंकल्या. प्रामाणिकपणे काम केल्यास जनता साथ देते. मी महिला सशक्तीकरण, स्त्री-पुरुष समानता या ध्येयासाठी काम करणार आहे. पर्यावरणाला केंद्रभागी ठेवून राजकारण केले पाहिजे. येत्या २२ जानेवारीला श्रीराम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. शेकडाे वर्षांच्या संघर्षानंतर रामलल्ला येणार आहेत आणि रामराज्यही येणार आहे, असेही चौहान यांनी सांगितले.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले की, भारतच विश्वशांती आणि सुसंवाद घडवून आणू शकतो. भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञान हेच अंतिम सत्य आहे. आता ही मूल्ये विश्वाला सांगण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांनी देण्यामागचा आनंद शिकला पाहिजे आणि आपल्या आचरणाने आदर्श निर्माण केले पाहिजेत.
राजकारणात येण्यासाठी घाबरू नका :
राजकीय क्षेत्रात येण्यासाठी घाबरू नका. चाेरी करणाऱ्यांच्या हातात राजकारण साेडणार का? राजकारणातील पैशांचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही काम करणार नाहीत का? असा सवाल उपस्थित करीत तुम्ही स्वत:तील शक्ती ओळखून नेतृत्व करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले.
भविष्यातील लोकनेते घडवण्यासाठी आणि युवा नेतृत्वाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. आपल्या लोकशाहीने परिपक्वतेच्या दिशेने वाटचाल करायला हवी. चारित्र्यसंपन्न आणि उच्चशिक्षित नेतृत्व घडवण्यासाठी आता जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. भारतीय छात्र संसदेच्या निमित्ताने आम्ही एक पाऊल उचलले आहे.
- राहुल कराड, कार्याध्यक्ष, एमआयटी