पुणे : कडक उन्हाळा मार्च महिन्यात सुरू होतो; परंतु अद्यापही हवेतील गारवा कमी झालेला नाही. यामुळे अद्यापही कडक उन्हाचा चटका पुणेकरांना बसत नाही. सकाळी आणि रात्रीदेखील थंड वाऱ्यांमुळे आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळत आहे. दुपारी जरासे उन्ह तापत असून, कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस नोंदवले जात आहे.
राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. १२ मार्चपर्यंत किमान तापमानात किरकोळ वाढ होणार आहे. पुण्यात व परिसरातील हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. कमाल तापमानात बदल होणार नसल्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. नुकताच ‘सीईई’ या संस्थेच्या अहवालानुसार यंदाचा उन्हाळा तापदायक असल्याचे स्पष्ट केले होते, पण मार्च महिना सुरू झालेला असला तरीदेखील उन्हाचा ‘ताप’ काही वाढताना दिसत नाही. उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे गारवा जाणवत आहे. पुण्यामध्ये मार्च महिन्याचे दहा दिवस झाले तरी कमाल तापमान ३५ अंशांवरच आहे, तर किमान तापमान १५ अंशांच्या खाली आहे. काही भागांत तर हे १२ अंशांवर नोंदवले जात आहे. शहरात दुपारी उष्णता आणि सकाळी, सायंकाळी गारवा या हवामान बदलामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सकाळच्या गारव्यामुळे दुपारनंतर चांगलाच ऊबदारपणा पुणेकरांना जाणवत आहे.
गेल्या महिन्यामध्ये पुण्यातील कोरेगाव पार्क, वडगावशेरी भागातील किमान तापमान २० अंशांपर्यंत नोंदवले जात होते; पण आता मात्र येथील किमान तापमान बरेच खाली आले आहे. उन्हाळा असतानाही या ठिकाणी १३-१४ अंशांवर किमान तापमान आहे. त्यामुळे शहरातील हवामानात खूप बदल होत असल्याचे दिसून येत आहे.
पुण्यातील किमान तापमान
हवेली : १२.५
कोरेगाव पार्क : १२.७
मगरपट्टा : १२.८
वडगावशेरी : १३.२
शिवाजीनगर : १४.८
पाषाण : १५.८
जम्मू काश्मीर, लेह-लडाख आणि हिमाचल प्रदेश या राज्यात एकापाठोपाठ असे दोन पश्चिमी झंजावात, (रविवार व मंगळवार) दि.१० व १२ मार्च रोजी रात्री प्रवेश करणार आहेत. त्यामुळे १० ते १४ मार्च असे ५ दिवस तेथे वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस, बर्फबारी व थंडी जाणवेल. परिणामी आपल्याकडे महाराष्ट्रातही त्या ५ दिवसांत वातावरण कोरडे राहून केवळ पहाटेची थंडीच फक्त जाणवणार आहे.
-माणिकराव खुळे, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ