पुणे : शाळांमधील प्रवेशित झालेल्या काही विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा सुरू झाली असून, काहींची परीक्षा आठवड्याभरात सुरू होणार आहे; मात्र तरीही शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशप्रकिया अद्याप पूर्ण झालेली नाही. आरटीई प्रवेशापासून वंचित असलेल्या पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना येत्या १५ आॅक्टोबरपर्यंत प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. राज्य शासनाकडून आरटीई प्रवेशाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यातच आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याने प्रवेशअर्ज करूनही अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. शिक्षण विभागाकडूनही प्रवेशाच्या फेऱ्या घेण्याबाबत अनास्था दाखविली जाते. दरम्यानच्या काळात बहुतेक शाळा सुरू होत असल्याने आरटीई प्रवेशाचा विचार न करता, पालक मिळेल त्या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश घेऊन देतात. यंदाही प्रवेशप्रक्रिया धिम्या गतीने राबविण्यात आली. त्यामुळे सहामाही परीक्षा सुरू झाल्यानंतरही, शिक्षण विभागाला आरटीई प्रवेशप्रक्रिया राबवावी लागत आहे.विद्यार्थ्यांना पुढील आठ वर्षे मोफत शिक्षण मिळावे म्हणून आॅक्टोबर महिन्यातही प्रवेशपरीक्षा राबविली जात असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितले जात आहे. आता प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना येत्या १५ आॅक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. शाळा बदलून हव्या असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या फेरीसाठी अर्ज करता येईल.(प्रतिनिधी)...तर अर्ज बाद करणार४जिल्ह्यातील ७८० शाळांमध्ये आरटीई प्रवेश राबविले जातात. त्यात २० हजार ५८१ विद्यार्थी प्रवेशास पात्र झाले असून, त्यातील ८ हजार २२२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. रिक्त जागांवर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. ज्यांचे प्रवेश झाले आहेत, त्यांनी अर्ज करू नये; तसेच दोन किंवा अधिक अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत, असे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
सहामाही आली, तरी आरटीई प्रवेश सुरु
By admin | Published: October 12, 2016 2:32 AM