पुणे : पुणे जिल्हा कोरोनाकाळातही रक्त संकलनात राज्यात अव्वल ठरला आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या आकडेवारीनुसार, गेल्या एका वर्षात राज्यात १५ लाख ४५ हजार ८२६ पिशव्यांचे संकलन झाले. त्यापैकी पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक २ लाख ४ हजार ३४५ पिशव्यांचे संकलन करण्यात आले. एका वर्षात जिल्ह्यात ३ हजार ५०३ रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या ऐच्छिक रक्तदानातून २ लाख २ हजार ९४१ पिशव्या रक्त जमा झाले.
पुणे विभागांतर्गत पुणे, सातारा आणि सोलापूर हे तीन जिल्हे अंतर्भूत आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक रक्तसंकलनामुळे पुणे विभागही राज्यात आघाडीवर आहे. पुणे जिल्ह्यात ३७, सातारा जिल्ह्यात १०, तर सोलापूर जिल्ह्यात १७ अशा मिळून विभागात एकूण ६४ रक्तपेढ्या आहेत. वर्षभरात पुणे जिल्ह्यात ३ हजार ५०३, सातारा जिल्ह्यात ५५४, सोलापूर जिल्ह्यात २ हजार २८ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. पुणे विभागातून ३ लाख ९१ हजार ६९७ पिशव्या रक्त संकलन झाले.
चौकट
राज्यात सर्वात कमी ८९ हजार ३५५ इतके रक्तसंकलन औरंगाबाद विभागात झाले. औरंगाबादमधून ५४, हिंगोलीमधून ४ हजार ६०६, जालन्यातून १७ हजार ६८३, परभणीमधून १२ हजार ८८३ रक्तपिशव्यांचे संकलन झाले. राज्यात एकूण ३४७ रक्तपेढ्या आहेत. वर्षभरात राज्यात २६ हजार १०४ रक्तदान शिबिरे झाली. कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यावर आता नॉन-कोव्हिड उपचार आणि शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. लसीकरणामुळेही रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी रक्त तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
चौकट
राज्याची आकडेवारी :
विभाग रक्तपेढ्या रक्तदान शिबिरे रक्त संकलन (पिशव्या)
पुणे ६४, ६०८५, ३९१६९७
मुंबई ५८, २५००, २३१२२६
नाशिक ५०, ५०२०, १९७९१५
नागपूर २९, २९१५, १५३२२९
ठाणे ४०, २२६०, १४३७२२
कोल्हापूर ३७, १९०६, १२१३०६
अकोला २८, १६८७, ११५४५०
लातूर २५, १९५९, १०१९२६
औरंगाबाद १६, १७७२, ८९३५५
--------------
पुणेकर अव्वल
जिल्हा रक्तपेढ्या रक्तदान शिबिरे रक्त संकलन
पुणे ३७, ३५०३, २०४३४५
सोलापूर १७, २०२८, १५१५१९
सातारा १०, ५५४, ३५८३३