अयाज तांबोळी / लोकमत न्यूज नेटवर्कडेहणे : जिल्ह्यात अनेक गावे भूस्खलनाच्या कोसळणाऱ्या संकटाच्या आपत्तीने घेरली गेली आहेत. खेड तालुक्यात भोमाळे, पदरवाडी, शेंदुर्ली, पाबे, नायफडच्या अनेक वाड्या कड्याखाली आहेत. ही गावे केव्हाही डोंगराच्या पोटात गायब होतील, अशी धोकादायक परिस्थिती आहे. भोमाळे गावात २0 वर्षांपूर्वी झालेल्या भूस्खलनाने गावाचा थरकाप उडाला होता. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही, परंतु तो धोका आजही कायम आहे. अनेक गावे अशीच कमकुवत डोंगराच्या पायथ्याशी वसलेली आहेत. या गावाला पुन्हा भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. तालुक्यातले भोमाळे, पदरवाडी, शेंदुर्ली, पाबे, नायफड च्या अनेक वाड्या, वांद्रेजवळ पंढरवाडी, तोरणे या गावांना भूस्खलनाचा धोका आहे. डोंगराच्या पायथ्याशी असल्याने त्या डोंगराच्या सुट्या झालेल्या धोकादायक कड्याखाली या गावांमधील शेकडो कुटुंबे मृत्यूची टांगती तलवार असतानाही राहत आहेत. भीमा व भामा खोऱ्यातली बहुतेक वाड्या कड्याखाली आहेत. भोमाळे गाव अदिवासी बहुल सुमारे ४५० लोकसंख्या असलेले गाव. अगदी पायथ्याशी भीमानदी तर डोक्यावर आ वासून उभा असलेला महाकाय आणि तेवढाच ढिसाळ कमकुवत डोंगर. ७० ते ७५ कुटुंबे कुशीत घेतलेल्या गावाने जुलै १९९५ मध्ये पहाटे कोसळलेल्या डोंगराच्या संकटाचा थरकाप उडवणारा अनुभव घेतला आहे. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या गावाला भेट दिली होती, त्यानंतर समिती नेमण्यात आली होती , पण गाव आजही त्याच परिस्थितीत आहे. ]भोमाळेचा सर्व्हे होऊन वीस वर्षे झाली, आम्ही लहान होतो, आतापण माळीणनंतर एकदा समिती आली होती, पुनर्वसन करण्यात येईल असे सांगितले. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून २३ गावांमध्ये भोमाळेपण आहे . जिल्हाधिकाऱ्यांची जीएसआय कमिटी येणार होती, पण दोन वर्षांत इकडे कोणी फिरकले नाही. या धोकादायक गावांचे पुनर्वसन व उपाययोजना करण्यात याव्यात हीच अपेक्षा आहे.- मनोहर शिंदे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, भोमाळे
आजही २0 वर्षांपूर्वीच्या धोक्याचे सावट कायम
By admin | Published: July 05, 2017 2:34 AM