पुणे : पुण्याची विसर्जन मिरवणूक ही गणेशोत्सवाची शान असते. ढोलताशांच्या गजरात ’गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जल्लोषात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो. मात्र, १२५ वर्षांपासून चालत आलेल्या पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाच्या मिरवणूक परंपरेत कोरोनामुळे खंड पडला आहे. घरगुती, मानाचे गणपती तसेच प्रमुख व इतर सर्व मंडळांच्या गणपतींचे विसर्जन उद्या, रविवारी साधेपणाने करण्यात येणार आहे. अनेक मंडळांनी मांडवाजवळ कृत्रिम हौदाची निर्मिती केली आहे. सकाळी दहा वाजता महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला परंपरेनुसार पुष्पहार अर्पण केल्यानंतर विसर्जनाचा सोहळा सुरू होईल.
-----------------------------
कसबा गणपती
मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींच्या मूर्तीला महापौर सकाळी साडेदहा वाजता पुष्पहार अर्पण करतील. परंपरेप्रमाणे श्रींची मूर्ती पालखीतून मांडवाजवळील कृत्रिम हौदापाशी आणली जाईल. त्यानंतर येथे घरगुती गणपती मूर्तींच्या विसर्जनाची सोय उपलब्ध असेल.
----------------------------
तांबडी जोगेश्वरी
मानाच्या दुसऱ्या श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींच्या मूर्तीला महापौरांकडून पुष्पहार अर्पण करण्यात येईल. विसर्जनासाठी मांडवाजवळ कृत्रिम हौद उभारण्यात येणार आहे.
----------------------------------
गुरुजी तालीम मंडळ
मानाच्या तिसऱ्या श्री गुरुजी तालीम मंडळाच्या बाप्पाला महापौर दुपारी १२.३० वाजता पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर गुलालाची उधळण करून मांडवाजवळील कृत्रिम हौदात मूर्तीचे विसर्जन करण्यात येईल.
---------------------------------
तुळशीबाग
मानाच्या चौथ्या श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींच्या मूर्तीला महापौर दुपारी १.१५ वाजता पुष्पहार अर्पण करतील. श्री तुळशीबाग मंडळाने आकर्षक गजकुंड केलेले असून, त्यावर फुलांची सजावट असणार आहे. पारंपरिक धार्मिक पद्धतीने उत्सवमंडपात गणरायाचे विसर्जन मंडळाचे अध्यक्ष विकास पवार यांच्या हस्ते होणार आहे.
-----------------------------
केसरी गणेशोत्सव
मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची मूर्ती परंपरेनुसार पालखीतून मांडवात आणली जाईल. महापौर दुपारी दोन वाजता गणपतीच्या मूर्तीला आणि लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर मांडवातील कृत्रिम हौदात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येईल.
-------------------------------------