पुणे : देशभरात सुमारे १ लाख मुलांमध्ये टाईप १ डायबेटिसचे निदान झाले आहे. मुलांमधील मधुमेहाचे निदान पालकांसाठी चिंतेची बाब बनत आहे. नवजात बालकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण ०.१-०.४ टक्के, १ ते २ वर्षांच्या मुलांमध्ये ०.२-०.५ टक्के, ३ ते ५ वर्षांच्या मुलांमध्ये ०.५ ते ०.७ टक्के तर ५ ते १० वर्षे वयोगटातील मुलांमध्ये हे प्रमाण ०.५ ते १ टक्का इतके आहे. जनुकीय दोषामुळे अथवा आॅटो इम्युन अर्थात अँटिबॉडी इन्सुलिन निर्माण करणा-या पेशींना नष्ट करत असल्यामुळे मुलांमध्ये टाईप १ डायबेटिसचे निदान होत आहे. त्यामुळे अनेक मुलांना आयुष्यभर इन्सुलिनचे डोस घ्यावे लागतात.
लहान मुलांमध्ये टाईप १ मधुमेह झाल्यास स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन तयार होत नसल्याने पेशींना ग्लुकोज मिळत नाही आणि ते रक्तातच साठून राहते. रक्तातील ग्लुकोजचा शरीराला उपयोग व्हावा, यासाठी कायम इन्सुलिनच्या इंजेक्शनवर अवलंबून रहावे लागते. टाईप १ मधुमेह असलेल्या मुलांमध्ये साखरेची पातळी संतुलित राहिल्यास मुलांची वाढ आणि विकास योग्य पद्धतीने होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी मुलांचा आहार आणि व्यायामामध्ये नियमितता ठेवणे आवश्यक असते, असे बालरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोरोना विषाणूचा शरीरातील अनेक अवयवांवर परिणाम होत असतो. विषाणू इन्सुलिन निर्माण करणा-या ग्रंथींवरही हल्ला करतो आणि त्यामुळे लहान मुलांमध्ये मधुमेहाची लक्षणे दिसू लागतात, असे काही संशोधनांतून सिद्ध झाले आहे. मधुमेहाचे योग्य व्यवस्थापन करता यावे, यासाठी इन्सुलिन पंप थेरपीचाही ब-याच प्रमाणात वापर केला जात आहे. यामध्ये केवळ एका बटणाच्या साहाय्याने इन्सुलिन घेता येते आणि हे पंप कोठेही जाताना जवळ बाळगता येतात.
---------------
मधुमेहाची लक्षणे :
१) वजन न वाढणे किंवा कमी होणे
२) पाणी पिण्याचे प्रमाण प्रचंड वाढणे
३) चिडचिडेपणा वाढणे
४) मूत्र संसर्ग होणे
५) त्वचेवर लाल चट्टे उठणे
-----------------
बाळांमध्ये टाईप १ मधुमेहाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. ४-५ वर्षांच्या मुलांमध्ये प्रमाण काहीसे जास्त असते. मुलांमध्ये जनुकांमधील दोष किंवा काही वेळा विषाणूजन्य आजारांच्या प्रादूर्भावानंतर मधुमेहाची लक्षणे दिसू लागतात. त्यांच्यामध्ये डायबेटिक किटो अॅसिडोसिस ही स्थिती निर्माण होऊ शकते. मुलांमध्ये कायम इन्सुलिनचा वापर करावा लागतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने वयोगटानुसार इन्सुलिनचे डोस ठरवता येतात. साखरेची पातळी संतुलित राहिल्यास मुलांच्या वाढीवर मधुमेहाचा परिणाम होत नाही.
- डॉ. संजय नातू, बालरोगतज्ज्ञ
-------------
अँटिबॉडी इन्सुलिन तयार करणा-या पेशी नष्ट करू लागल्यास किंवा जनुकीय समस्यांमुळे लहान मुलांमध्ये टाईप-१ मधुमेहाचे निदान होते. नवजात बालकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण ०.१-०.४ टक्के, १ ते २ वर्षांच्या मुलांमध्ये ०.२-०.५ टक्के, ३ ते ५ वर्षांच्या मुलांमध्ये ०.५ ते ०.७ टक्के तर ५ ते १० वर्षे वयोगटातील मुलांमध्ये हे प्रमाण ०.५ ते १ टक्का इतके आहे. मुलांमध्ये साखरेची पातळी संतुलित न राहिल्यास भविष्यात दृष्टिदोष, किडनीचे विकार आदींचा सामना करावा लागू शकतो.
- डॉ. राहुल जहागीरदार, लहान मुलांचे ग्रंथीरोगतज्ज्ञ