पुणे : रस्ते रुंदीकरण, मेट्रोची बांधणी केली तर झोपडपट्टी धारकांचे प्रश्नही मोठे आहेत. त्यांनी कायम झोपडीत राहायचं का असं विचारत आगामी काळात निवडणुका इव्हेंट मॅनेजमेंटने नाही तर कामाने जिंकाव्या लागतील असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात व्यक्त केले.
पुणे शहराच्या महापौरपदी निवड झाल्याबद्दल मुरलीधर मोहोळ यांच्या सर्वपक्षीय सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, राष्ट्रवादीचे अंकुश काकडे, शिवसेनेचे शशिकांत सुतार, काँग्रेसचे रमेश बागवे, मनसेचे किशोर शिंदे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, 'आगामी काळात निवडणुका जिंकता येणार नाहीत, एव्हन्ट मॅनेजमेंटवर नेता होता येणार नाही आणि राज्यही चालवता येणार नाही. प्रत्यक्ष सामान्य माणसाला विश्वास वाटला तर निवडून येता येईल. असा विश्वास फडणवीस यांच्या बद्दल जनतेला वाटला आणि त्यामुळे वसंतराव नाईकांप्रमाणे सलग पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले. शेवटच्या दिवशी पैसे वाटून काही होणार नाही असेही ते म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, ' मोहोळ यांच्या कारकिर्दीची ही सुरुवात आहे. भविष्यातला उमदा नेता म्हणून मी त्यांच्याकडे बघतो. महापौर पद निभावणं कठीण आहे. मागच्या जन्मी ज्याने पाप केलं तो नगरसेवक बनतो आणि महापाप केलं तो महापौर बनतो. या पदावर काम करताना कौतुक कमी आणि शिव्या जास्त ऐकायला मिळतात. मात्र काम करताना समाधान मिळतं, अडचणी दूर करायला मिळतात. त्यामुळे विलक्षण अनुभव असतो. राजकारणात संयम महत्वाचा असतो.काय बोललं पाहिजे, कधी बोललं पाहिजे जे महत्वाचं असत. हल्ली तर कधी बोलू नये हे देखील महत्वाचे असते आणि ते मोहोळ यांना व्यवस्थित ठाऊक आहे असेही ते म्हणाले.