बारामती - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कॅशियरने खोटा आळ घेतल्यामुळे अपमान सहन न झालेल्या महाविद्यालयीन युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. काटेवाडी (ता. बारामती) येथे बुधवारी (दि. ३१) दुपारी ही घटना घडली. महेश भानुदास मुगुटराव कोळी (वय १७) असे या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची आजी कमल बबन मुगुटराव कोळी यांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या काटेवाडी शाखेतील कॅ शियरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार : फिर्यादी कमल बबन मुगुटराव कोळी (वय ६५, व्यवसाय शेती, रा. काटेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) या त्यांचा नातू महेश याच्यासह ३१ जानेवारीला दुपारी १२ च्या सुमारास खात्यावरील शिल्लक १४ हजार रुपये काढण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या काटेवाडी शाखेत गेल्या होत्या. या वेळी आरोपीने महेश यास ३० जानेवारीला तुझ्याकडे जास्त पैसे गेले आहेत. ते घेऊन ये, असे सांगितले. त्यावर महेश त्याच्या आजीला बँकेत थांबवून घरी गेला. त्यानंतर ३० जानेवारीला बँकेतून काढलेले ४९ हजार रुपये घेऊन आला. हे पैसे त्याने आरोपीला दाखविले. नंतर महेश याने खात्यावर राहिलेले १४ हजार रुपये काढले. त्या वेळी आरोपी याने महेश यास तुझ्याकडे जादा पैसे आलेले आहेत. ते परत आणून दे, नाहीतर तुझ्यावर पोलीस केस करू, अशी धमकी दिली.त्यानंतर फिर्यादी त्यांचा नातू महेशसोबत घरी आले. या वेळी महेश फिर्यादीला म्हणाला, की आरोपीने मला बँकेत दमदाटी केली. त्यामुळे माझा अपमान झाला व जिव्हारी लागले आहे. परत त्या बँकेचे तोंड पाहायचे नाही, असे म्हणाला. असे म्हणून तो घरातील रूममध्ये कडी लावून अभ्यास करायला बसला. दुपारी फिर्यादीची सून संगीतादुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घरी आली. तिने महेश अभ्यास करायला बसलेल्या रूमचादरवाजा वाजविला. परंतु दरवाजा आतून बंद असल्याने उघडला नाही. नंतर फिर्यादी व त्यांची सून संगीता यांनी रूमच्या खिडकीतून डोकावून पाहिले. या वेळी महेश याने खोलीतील लोखंडी अँगलला गळफास घेऊन तो लटकत असल्याचे त्यांनी पाहिले.या दोघींनी आरडाओरडा केल्यावर गावातील लोक एकत्र झाले. त्यांनी घराचा दरवाजा दगडाने तोडला. आत जाऊन पाहिले असता महेश याने डाव्या हातावर पेनने ‘माझ्या मरणासाठी जबाबदार बँक कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी. आई, आबा, अक्का माफी असावी,’ असे लिहिले होते. गावातील लोकांनी गावातील सरकारी डॉक्टरला बोलावले. डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या काटेवाडी शाखेतील कॅशियरने महेश याच्याविरुद्ध खोटा आळ घेतल्याने, त्याचा अपमान केला. तो महेशच्या जिव्हारी लागल्याने त्याने आत्महत्या केली, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड अधिक तपास करीत आहेत.याप्रकरणी आरोपी कॅ शियर फरारी झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत, असे पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मनोज घोळवे असे या कॅ शियरचे नाव असल्याचे गौड यांनी सांगितले.
बारामती येथील घटना : कॅशियरने खोटा आळ घेतल्याने युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 2:37 AM