नºहे : नºहे धायरी येथील श्री कंट्रोल चौकाजवळ असणाऱ्या स्कायरनवे या नेटवर्किंग मार्केटिंग कंपनीच्या विरोधात जवळजवळ १८ तरुण- तरुणींनी पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानुसार सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याने अधिक तपास करून अखेर स्कायरनवे कंपनीच्या पाच संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नºहे-धायरी परिसरात असणाºया या कंपनीने मार्केटिंगसाठी एक साखळी केली असून, यामध्ये सबंध महाराष्ट्रातील बेरोजगारांना टार्गेट करून जॉबसाठी म्हणून तरुण- तरुणींना प्रथम दोन हजार रुपये भरून पाच दिवसांचे ट्रेनिंग दिले जात होते. या पाच दिवसांच्या ट्रेनिंगमध्ये नोकरीबद्दल नकारात्मकता निर्माण करून बिझनेस करा आणि बिझनेस मध्ये लाखो रुपये कसे कमावता येतात याबद्दल सांगितले जात असे व ट्रेनिंगनंतर ४३ हजार रुपये भरा आणि आमच्या कंपनीचे डिस्ट्रिब्युटर बना असे सांगितले जाते.
डिस्ट्रिब्युटरशिप घेतल्यानंतर मात्र आता तुम्ही तुमच्या खाली अजून बाकी लोक जोडा मग तुम्हाला ९००० रुपये कमिशन स्वरूपात मिळतील. अशा साखळी पद्धतीचे स्वरूप कंपनीचे आहे. मुळात ही कंपनी जाहिरात करताना जॉब आॅफर म्हणून सोशल माध्यमातून करत असल्याची तक्रार आहे. मात्र प्रत्यक्षात तिथे जॉब नसून त्याठिकाणी पैसा कमविण्यासाठी साखळी पद्धत अवलंबली जाते. यामध्ये माऊथ टू माऊथ कंपनीचे मार्केटिंग तरुण-तरुणींना करायला सांगून बाकीच्या नवीन तरुणांनाही कंपनी जॉईन करायला भाग पाडते. या वेळी कमी वेळेत तुम्हाला जास्त पैसे मिळतील तसेच कंपनीतर्फे तुम्हाला लाईफ टाईम लायसन्स मिळेल, सोन्याचा बिल्ला, स्पोटर््स बाईक, परदेशी सहल, आणि महिना १ ते ३ लाख रुपये फायदा मिळेल आदी प्रकारची खोटी स्वप्ने दाखविण्यात येतात. ट्रेनिंगनंतर आलेल्या नवीन तरुण-तरुणींना मुलाखतीसाठी बसविले जाते. परंतु मुलाखत हा एक दिखावा असून, प्रत्यक्षात निवड ही पैसे भरण्याच्या ऐपतीवर केली जाते असेही तरुण-तरुणींनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.
याबाबत कंपनीचे संचालक अविनाश जाधव, अभिजित सुतार, प्रवीण चव्हाण, सुनील जोशी, नितीन घोलप यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६० अधिनियमप्रमाणे कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक एच. एम. ननावरे करीत असून, यामध्ये फसलेल्या तरुण- तरुणींनी तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.