पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पिडीसीसी) बहुचर्चित नोकर भरती प्रक्रिया अखेर थांबविण्यात आली आहे. जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. बँकेच्या ३५६ जागांसाठी तब्बल ३७ हजार ५०० उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
मुदतवाढ मिळालेल्या संचालक मंडळाला कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यावर मर्यादा आहेत. तसेच संचालक मंडळ निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा बँकेने लिपिक पदाची मेगा भरती जाहीर केल्याने सर्वत्र हा चर्चेचा विषय झाला होता. मुदत वाढीवर असलेल्या संचालक मंडळाला धोरणात्मक निर्णय घेऊन अशी कर्मचारी भरती करता येते का असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
दरम्यान राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना असलेली स्थगिती उठवल्यानंतर जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आवश्यक असणारी मतदारांची अंतिम यादी जाहीर झाली असून, चालू आठवड्यात निवडणूक कार्यक्रम देखील घोषित होणार आहे.
निवडणुका जाहिर झाल्याने थांबवली निवडणूक
''जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे बँकेतील लिपिकांची नोकरभरती करता येणार नाही. नोकर भरतीची प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली आहे. संचालक मंडळाची निवडणूक होऊन नवीन मंडळ झाल्यानंतर नियमानुसार भरती प्रक्रिया केली जाईल. लिपिक भरती साठी १०० गुणांची परीक्षा असेल त्यामध्ये ९० गुण लेखी परीक्षेसाठी असतील ५ गुण हे त्याच्या शैक्षणिक पात्रते बद्दल असतील तर ५ गुण मुलाखतींसाठी राखीव ठेवण्यात आले आहे असे पुणे जिल्हा बँक अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले.''