पुणे : दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पुण्यातील दिव्यांगांच्या शिष्टमंडळाने मुंबईत जाऊन मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांचे आभार मानले. पुणेरी पगडी देत मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. जागतिक दिव्यांग दिनी ३ डिसेंबरला याची घोषणा करण्यात येणार आहे.
प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. प्रहारचे पुण्यातील पदाधिकारी, पॅरा टार्गेट शूटिंगचे अध्यक्ष व शासकीय दिव्यांग कल्याण व पुनर्वसन कमिटीचे विशेष सदस्य रफिक खान यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, मागील अनेक वर्षांची दिव्यांगांची मागणी पूर्ण होणार याचा समस्त दिव्यांगांना आनंद आहे. यातून राज्यात दिव्यांगांची खऱ्या अर्थाने प्रगती होईल, असे ते म्हणाले. महिला कार्यकर्त्या भाग्यश्री मोरे, पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीश गाडे, कार्यकर्ते गुलाम मोमीन हेही उपस्थित होते. दिव्यांगांसाठी अंदाजपत्रकात स्वतंत्र तरतूद असलेली ५ टक्के रक्कम योग्य कारणांसाठी व दिव्यांगांना खऱ्या अर्थाने उपयोग होईल याच पद्धतीने खर्च करावी, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे करण्यात आली.