मोरगाव : मोरगाव प्रादेशिक योजनेच्या जलवाहिनीतून बारामतीच्या जिरायती भागातील १७ गावांना पाच दिवसांनंतर अखेर बुधवारी (दि. २०) पाणी मिळाले. मागील पाच दिवसांपासून ग्रामस्थांचे होणारे हाल थांबल्याने सुटकेचा नि:श्वास टाकला. ही जलवाहिनी फुटल्याने १७ गावे व १० वाड्यांना पाणीपुरवठा करणे जिकिरीचे झाले होते. त्यात येथे टँकर नसल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. मोरगाव प्रादेशिक नळ योजनेवरील नवीन जलवाहिनीवर आंबी बु., आंबी खुर्द, जोगवडी, भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी, सुपा, मोरगाव, तरडोली, लोणीभापकर, अंजनगाव, कऱ्हावागज, जळगाव भिलारवाडी, बाबुर्डी, काऱ्हाटी ही १७ गावे आहेत, तर जुन्या जलवाहिनीवर मासाळवाडी, लोणी पाटी, गोलांडेवस्ती क्र. १, क्र. २, बोरावकेमळा, लोणकरमळा, बारवकरमळा आदी वाड्या अवलंबून आहेत. > या जलवाहिन्यांमधून नाझरे जलाशयातून दिवसाआड पाणी पुरवठा होतो. मात्र, नाझरे येथे नवीन जलवाहिनी फुटल्याने व मोरगाव येथे जलवाहिनीचा जोड निसटल्याने पाच दिवस येथील ग्रामस्थांना पाणी पाणी करावे लागले होते. पिण्यासाठी, जनावरांसाठी पाणी नसल्याने ग्रामस्थ पाण्यासाठी वनवन फिरत होते. हातपंप, विहिरी, कुपनलिका कोरड्या असल्याने वरील सर्व गावांमध्ये पाणीप्रश्न गंभीर झाला होता. त्यातच गावोगावी अद्याप टँकर मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. अखेर तब्बल पाच दिवसांनी आज पाणी आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. नाझरे जलाशयातून पाणी मिळणार असल्याने काही प्रमाणात प्रश्न सुटेल.> टँकर बंद; ग्रामस्थांचे हाल पारवडी : परिसरातील मागील ३ दिवसांपासून वाड्या-वस्त्यांवरील टँकर बंद असल्याने वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. येथील शेतकऱ्याने ओढ्याच्या बंधाऱ्यातील बेकायदा उपसा केल्याने पाणीपुरवठा विहिरीचे पाणी आटले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यावर येथे टँकरही सुरू करण्यात आला. मात्र, तीन दिवसांपासून टँकर बंद झाल्याने ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल सुरू झाले आहेत. त्यामुळे भाड्याने वाहन ठरवून ग्रामस्थ बाहेर गावाहून पाणी आणत आहेत. मागील आठवड्यापासून सुरू आसलेले पाणी टँकर गावठाण वगळता वाड्या-वस्त्यांवरील टँकर पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे वाड्या-वस्तींवर तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. याला पर्यायी व्यवस्था म्हणून ग्रामस्थांनी पैसे मोजून पाणी वाहत आहेत.
अखेर १७ गावांची तहान भागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2016 1:08 AM